Mumbai Local Train Accident: ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ (Mumbra Railway Station) भयंकर रेल्वे दुर्घटना (Mumbai Local Train Accident) घडली. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान 13 जण रेल्वेमधून पडले. कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी लटकून जात होते. त्याचवेळी सीएसएमटीवरुन निघालेली दुसरी लोकल प्रवाशांना घासली. यावेळी 13 प्रवासी खाली पडले आणि 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. ठाण्याचे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात तीन तर कळवा रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. सात जखमींवर कळवा रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर दोन गंभीर जखमींना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Continues below advertisement


देशातील जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या उपनगरीय लोकल रेल्वेमार्गाने गेल्या दोन दशकांत तब्बल 51,802 नागरिकांचे प्राण घेतले आहेत. म्हणजेच सरासरी दररोज 7 जणांचा मृत्यू या लोकलमार्गावर होतो, हे धक्कादायक वास्तव मध्य आणि पश्चिम रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून समोर आले आहे. सदर अपघातानंतर रेल्वे सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र आज मध्य रेल्वेने एक महत्वाची माहिती दिली. यामध्ये नवीन गाड्यांमध्ये ऑटोमेटिक डोअर क्लोजर असेल. सध्याच्या लोकल गाड्यांनाही ऑटोमेटिक डोअर लावण्यासंदर्भात विचार केला जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. परंतु ऑटोमेटिक डोअर क्लोजर लावल्यानंतर ते किती योग्य आहे?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच ऑटोमेटिक डोअर क्लोजर लावण्यावरुन अनेकांची मते वेगवेगळी असल्याची पाहायला मिळत आहे. 


ऑटोमेटिक डोअर क्लोजर बसवण्याबाबत शरद पवार काय म्हणाले?


आज मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ झालेल्या अपघातावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी ट्विट करत मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. तसेच द्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्वांच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी देखील शरद पवारांनी केली आहे. त्याचप्रमाणे वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. म्हणजेच मध्य रेल्वेच्या ऑटोमेटिक डोअर क्लोजर लावण्यावर शरद पवार सहमत असल्याचे दिसून येत आहे. परंतु मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ऑटोमेटिक डोअर क्लोजर लावण्यावर परखड मत व्यक्त केलं आहे. 


...तर लोकं गुदमरून मरतील- राज ठाकरे


मी रेल्वेने प्रवास केला आहे, त्यामुळे मला प्रवास माहीत आहे. कारण, त्यावेळी गर्दी कमी असायची. आता, मुंबईत संध्याकाळी मेट्रोत शिरून दाखवा, असं मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले. आज जो अपघात झालाय तो काय नवा नाही. रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे, त्यापेक्षा त्यांनी जाऊन स्थिती बघावी, असेही राज ठाकरे यांनी म्हटले. तर, रेल्वेनं लोकलचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यावरही वास्तववादी प्रतिक्रिया दिली. लोकलचे डोर क्लोज केले तर लोकं गुदमरून मरतील, अशा शब्दात राज ठाकरेंनी मुंबईतील वाढती गर्दी आणि रेल्वे प्रशासनावर परखडपणे भाष्य केलं. 


लोकल अपघात, राज ठाकरे यांचा संताप, VIDEO:



संबंधित बातमी:


Mumbai Railway Accident News: मुंबईत मोठा रेल्वे अपघात, दोन लोकल आजूबाजूने धावत होत्या, प्रवाशांचा बॅग घासल्या अन् 8 प्रवाशी धडाधड ट्रॅकवर पडले, 6 जणांचा मृत्यू


Mumbai Local Train Accident: प्रवासी एकामागोमाग धडाधड ट्रेनमधून खाली पडत होते; रेल्वे स्टेशनवरील प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार अनुभव