Mumbai Local Train Accident: मध्य रेल्वेवरील (Central Railway) मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ 9 जून रोजी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना (Mumbai Local Accident) घडली. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान 13 जण रेल्वेमधून पडले. कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी लटकून जात होते. त्याचवेळी सीएसएमटीवरुन निघालेली दुसरी लोकल प्रवाशांना घासली. यावेळी 13 प्रवासी खाली पडले आणि 4 प्रवाशांचा मृत्यू झाला.
मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ एक मोठं वळण आहे. यावेळी लोकलमधून प्रवासी फूटओव्हरवरुन प्रवास करत होते. एका ट्रॅकवरुन सीएसएमटीकडे लोकल जात होती. तर दुसऱ्या ट्रॅकवरुन कसाराच्या दिशेने लोकल जात होती. यावेळी दोन्ही लोकलमधील दरवाजावरील प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली आणि 13 प्रवासी धडाधड रेल्वे ट्रॅकवर पडले. आता रेल्वे प्रवासी संघटनने या अपघाताबाबत धक्कादायक आरोप केला आहे.
रेल्वेला मोठा स्क्रॅच पडल्याचा व्हिडीओ-
दोन लोकल गाड्या एकमेकांच्या जवळून वळणावरून जात असताना त्या एकमेकांना घासल्या गेल्याने हा अपघात झाल्याचा आरोप रेल्वे प्रवासी संघटनेने केला आहे. रेल्वेला मोठा स्क्रॅच पडल्याचा व्हिडीओ देखील रेल्वे प्रवासी संघटनेने समोर आणला आहे. लोकल एका बाजूला झुकल्यामुळे दुसऱ्या लोकांना ती घासली गेली असल्याचं रेल्वे प्रवासी संघटनेचे म्हणणं आहे. त्यामुळे एका लोकलवर तशा प्रकारचे स्क्रॅच पाहायला मिळाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मात्र या व्हिडीओची पुष्टी एबीपी माझा करत नाही.
रेल्वे प्रशासनाचे काय स्पष्टीकरण दिलं?
दोन लोकल गाड्या मुंबई स्टेशन वर जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध बाजूने धावत होत्या. तेव्हा त्यातील एका लोकलवर काहीतरी घासल्याचे स्क्रॅच पाहिला मिळाले. नेमकं या लोकलच्या रॅकला काय घासलं गेलं? यासाठी समिती नेमून याची सखोल चौकशी रेल्वे अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. रॅकमधील अंतर पाहता रॅक घासले गेले नाही असं रेल्वे प्रशासनाचे म्हणणं आहे. प्रथमदर्शनी प्रवासी बॅग घासली गेल्याने हे स्क्रॅच आल्याचं निदर्शनास आलं. ही लोकल कळवा कारशेड इथे नेण्यात आली असून या सगळ्या प्रकाराची आणि कारणांची माहिती घेतली जातीये आणि चौकशी रेल्वेकडून केली जात आहे.
Central Railway: अपघातानंतर मध्य रेल्वेचे महत्त्वाचे निर्णय
1. नवीन गाड्यांमध्ये ऑटोमेटिक डोअर क्लोजर असेल.
2. सध्याच्या लोकल ट्रेन्सनाही ऑटोमेटिक डोअर लावण्यासंदर्भात विचार केला जाईल.
3. कल्याण कसारापर्यंत तिसरी आणि चौथी लाईन तर कुर्लापर्यंत पाचवी आणि सहावी लाईन नियोजित
4. ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार
5. सरकारी आणि खासगी कार्यालयांनी एकच ऑफिस टाईम न ठेवता वेगवेगळे इन-आऊट टाईम ठेवावे