मुंबई: मुंबईत सकाळी ऐन गर्दीच्या काळात मध्य रेल्वेवर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टिटवाळा येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या एसी लोकलचा एसी अचानक बंद पडल्याने लोकलमध्ये प्रवाशांचा जीव गुदमरला. मुलुंड रेल्वे स्थानकात ही लोकल तब्बल १५ मिनिटे ठप्प होती. गुदमरल्यामुळे काही प्रवासी लोकलमध्येच बेशुद्ध पडले, ज्यामुळे रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
Mumbai AC Local: टिटवाळा-सीएसएमटी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड
सकाळी ८:३३ वाजता टिटवाळा येथून निघालेली ही एसी लोकल सकाळी साडे नऊच्या सुमारास मुलुंड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर दाखल झाली. मध्य रेल्वेवर सकाळी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची, विशेषतः कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी असते. या लोकलमध्येही प्रवाशांची संख्या मोठी होती. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे या लोकलचे एक एसी युनिट काम करत नव्हते. लोकलचे दरवाजे आणि खिडक्या पूर्णपणे बंद असल्याने आत अचानक उकाडा वाढला आणि प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
Mumbai AC Local: प्रवासी बेशुद्ध; इतर नागरिकांकडून मदत
एसी बंद पडल्याने अस्वस्थ होऊन ३ ते ४ प्रवासी जागीच बेशुद्ध पडले. यामध्ये काही महिला प्रवाशांचा समावेश होता. लोकलमध्ये प्रवासी बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना तात्काळ लोकलमधून बाहेर काढण्यात आले. रेल्वे स्थानकावरील इतर प्रवाशांनी पुढे येत त्यांना प्लॅटफॉर्मवरील बाकड्यावर बसवले, त्यांना पाणी दिले आणि वारा घालून पुन्हा शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला.
Mumbai AC Local: महिला प्रवाशांना प्राथमिक मदतीनंतर घरी सोडण्यात आले
या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. बेशुद्ध पडलेल्या प्रवाशांपैकी सुगंधा सिंग आणि राधिका गोटूवलेकर या महिला प्रवाशांना प्राथमिक मदतीनंतर घरी सोडण्यात आले आहे. तर फहीम अन्सारी यांना रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले असून, उपचारानंतर त्यांनाही घरी सोडण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या बिघाडानंतर ही एसी लोकल पूर्णपणे रद्द करण्यात आली. पुढील प्रवासादरम्यान कुर्ला स्थानकात सर्व प्रवाशांना उतरवून ही लोकल रेल्वे सेवेतून बाजूला करण्यात आली. ही बिघाड झालेली लोकल आता दुरुस्तीसाठी रेल्वेच्या कार्यशाळेत (वर्कशॉप) पाठवली जाणार आहे. या लोकलच्या इतर दोन सेवा (फेऱ्या) देखील रद्द करण्यात आल्या असून, त्यांच्याऐवजी सामान्य नॉन-एसी लोकल चालवल्या जाणार आहेत.
गर्दीच्या वेळी सुखावह प्रवासासाठी नागरिक जास्त पैसे देऊन एसी लोकलचा पर्याय निवडतात. परंतु, एसी लोकलचे दरवाजे आणि खिडक्या बंद असल्यामुळे तांत्रिक बिघाड झाल्यास प्रवाशांचा जीव थेट धोक्यात येतो. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अनेक साधारण लोकल गाड्या रद्द करून एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येत आहेत. मात्र, एसी लोकलचे भाडे सर्वसामान्य प्रवाशांना परवडत नसल्याने आणि यामुळे सामान्य लोकलचे वेळापत्रक खोळंबत असल्यामुळे प्रवाशांमधून या निर्णयाला आधीच विरोध होत आहे. गर्दीच्या वेळी प्रवासी दरवाजाबाहेर लटकत असल्यास दरवाजे बंद होत नाहीत, ज्यामुळे हा सुरक्षित पर्याय मानला जातो; मात्र आजच्या घटनेमुळे एसी लोकलच्या अंतर्गत सुरक्षेवर आणि देखभालीवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
