38 Hour Harbour Line Mega Block: मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी... हार्बर मार्गावर (Harbour Line) तब्बल 38 तासांचा मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान बेलापूर (Belapur) आणि पनवेल (Panvel) स्थानकांमधली वाहतूक शनिवारी रात्री 11 ते सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. काल (शनिवारी) रात्री 9 वाजता सीएसएमटीहून (CSMT) पनवेलसाठी शेवटची लोकल सुटेल, तर सोमवारी दुपारी 12 वाजून आठ मिनिटांनी सीएसएमटीहून पनवेलसाठी पहिली लोकल सुटणार आहे. ब्लॉकदरम्यान ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्ग सुरू राहणार आहे. दरम्यान, आज केवळ हार्बर मार्गावरील जम्बो मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तर मध्यरेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर कोणाताही मेगाब्लॉक घेतला जाणार नाही.
मुंबईच्या हार्बर मार्गावर काल (शनिवारी) रात्री अकरापासून 38 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील बेलापूर आणि पनवेल स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध नसतील. तर, 2 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजल्यानंतर मार्ग सुरळीत होणार आहे.
रेल्वे प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, मालवाहतुकीसाठी समर्पित असणाऱ्या 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'च्या कामासाठी हार्बर मार्गावर 38 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या दोन नवीन अप आणि डाऊन मार्गिकांच्या बांधकामाबरोबरच पनवेल उपनगरीय रिमॉडेलिंग कामासाठी बेलापूर-पनवेलदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
हार्बरवरील मेगाब्लॉक दरम्यान रेल्वेसेवा कशी असेल?
हार्बरवरील मेगाब्लॉकच्या काळात हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील बेलापूर आणि पनवेल स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसतील. हार्बर मार्गावर अप आणि डाऊन उपनगरीय सेवा बेलापूर, नेरुळ आणि वाशी स्टेशनपर्यंत चालवल्या जातील. तर ट्रान्सहार्बर मार्गावर अप आणि डाऊन उपनगरीय सेवा केवळ ठाणे आणि नेरुळ/वाशी स्टेशनदरम्यान सुरु राहिल.
दरम्यान हा मेगाब्लॉक सुरु होण्यापूर्वी सीएसएमटीहून पनवेलसाठी शेवटची लोकल रात्री 9 वाजून 2 मिनिटांनी सुटणार आहे. ही लोकल ट्रेन रात्री 10 वाजून 22 मिनिटांनी पनवेल स्थानकात दाखल होईल. तर अप हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल शनिवारी रात्री 10 वाजून 35 मिनिटांनी सुटेल. ही लोकल 11 वाजून 54 मिनिटांनी CSMT स्थानकात दाखल होईल. यानंतर लोकल सेवा बंद असणार आहे.
हार्बरवरील मेगाब्लॉकमुळे रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नाही
हार्बर मार्गावर 38 तासांचा मेगाब्लॉक असल्याने रविवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक घेतला जाणार नाही. याशिवाय पश्चिम रेल्वेवर देखील ब्लॉक नसेल. मागील आठवड्यात रविवारी देखील गणेशोत्सावामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ब्लॉक घेतलेला नव्हता.
दरम्यान, मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावरील आजचा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी आज जम्बो मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे.