मुंबई : लालबागचा राजा गणेशोत्सव पंडालातील व्हीआयपी (Lalbaugcha Raja VIP Darshan) आणि सामान्य दर्शन या वेगळ्या व्यवस्थेविरोधात दाखल केलेल्या तक्रारीची राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी राज्य सरकार तसेच संबंधितांनी लेखी उत्तर सादर करावं असे निर्देश मानवाधिकार आयोगाने दिले आहेत.
अॅड. आशिष राय आणि ॲड. पंकज मिश्रा यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी करताना आयोगाने या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस आयुक्त, लालबाग मंडळ सचिव, मंत्रालय तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका यांना नोटीस बजावली आहे. आयोगाने सर्व संबंधितांना लवकरात लवकर लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य भक्तांसोबत भेदभाव
तक्रारदारांचा आरोप आहे की, सार्वजनिक गणेशोत्सव असूनही दर्शन व्यवस्थेत व्हीआयपी आणि सामान्य भक्तांमध्ये भेदभाव केला जातो. या पद्धतीमुळे सामान्य नागरिकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागते, तर काहींना विशेष सवलत मिळते. हे भाविकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
गणेशोत्सव हा लोकउत्सव असल्याने दर्शन सर्वांसाठी समान आणि सुलभ असावे. दर्शन व्यवस्थेत भेदभाव टाळावा आणि सामान्य भाविकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
मानवाधिकार आयोगाच्या हस्तक्षेपामुळे आता राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांना आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
सेलिब्रिटी, राजकीय नेत्यांना थेट दर्शन
गणेशोत्सव काळात दर्शनासाठी भाविकांची विविध मंडळांत मोठी गर्दी असते. पुणे असो किंवा मुंबई भाविक गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी तासन तास रांगेत उभे राहतात. त्यातच, मुंबईतील लालाबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची चढाओढ असते. अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे दर्शनासाठी भाविक येतात. मात्र, लालबागचा राजा गणेश मंडळाने व्हीआयपी आणि नॉन व्हीआयपी अशी दर्शनरांग केल्यामुळे भक्तांमध्ये भेदभाव करण्यात आल्याचं दिसून येत आहे.
व्हीआयपी रांगेतून मुंबईतील सेलिब्रिटी, राजकीय नेते, उद्योगपती आणि ज्यांचा तगडा वशिला आहे, ते लालबागच्या राजाचरणी सहजपणे नतमस्तक होतात. मात्र, सर्वसामान्यांना तासन तास रांगेत उभे राहूनही नीट दर्शन घेऊ दिले जात नाही. सोशल मीडियावर या दर्शनरांगेचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळेच, मानवाधिकार आयोग नेमकं काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही बातमी वाचा: