मुंबई : मुंबईतील मुलुंडमध्ये राहणारी महिला युरोपमध्ये अडकून पडली आहे. दुकानातून गॉगल चोरल्याच्या आरोपामुळे तुर्कस्थानातील कोर्टाने तिला मायदेशी परतण्यास मनाई केली आहे.
59 वर्षीय रेणू नरुला 20 एप्रिलला 18 मैत्रिणींसोबत युरोप टूरवर फिरायला गेल्या होत्या. तुर्कस्थानातील इस्तंबुल विमानतळावर असलेल्या एका अॅक्सेसरिजच्या दुकानात काही जणी गेल्या होत्या. त्यांनी काही गॉगल घालून बघितले, मात्र कोणीच काहीही खरेदी केली नाही.
दुकानातून बाहेर पडून सर्व जणी एका कॅफेत गेल्या. तिथे गॉगलच्या दुकानातील कर्मचारी आले आणि रेणू यांनी गॉगल चोरल्याचा आरोप त्यांनी केला. रेणू यांनी आरोप नाकारताच त्यांची बॅग घेऊन कर्मचारी दुकानात गेले. बॅगेत पासपोर्ट, पैसे असल्यामुळे रेणू त्यांच्या पाठोपाठ जात होत्या.
दुकानात रेणू यांची बॅग कर्मचाऱ्यांनी तपासून पाहिली, तेव्हा त्यात दोन गॉगल्स सापडले. रेणू यांनी ते आपलेच गॉगल असल्याचं सांगितलं. गॉगलचे पैसे देण्याचा प्रश्नच येत नसल्याचं सांगितलं.
दुकान कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेणू पर्समध्ये काहीतरी ठेवताना दिसतात. रेणू यांनी तो पेपर नॅपकिन असल्याचं सांगितलं, तर कर्मचाऱ्यांनी मात्र ते गॉगलचे प्राईज टॅग असल्याचा दावा केला.
सीसीटीव्हीमध्ये आपण गॉगल चोरत असल्याचं कुठेही दिसलं नाही, असं रेणू यांनी सांगितलं. पोलिसांनी अखेर रेणू यांना कोर्टात नेलं, तर त्यांच्या मैत्रिणी अथेन्सला रवाना झाल्या.
रेणू यांना कोठडीत ठेवण्याची गरज नसल्याचं सांगत स्थानिक कोर्टाने त्यांना हॉटेल सोडण्यास मनाई केली आहे. त्यामुळे गेल्या बारा दिवसांपासून त्या तुर्कीतील हॉटेलमध्येच अडकल्या आहेत.
'माझे 94 वर्षीय सासरे घरी एकटे आहेत. माझ्याकडे असलेले पैसे संपत आले आहेत. इथे किती दिवस थांबायचं, हेही ते सांगत नाहीत' असा त्रागा रेणू यांनी व्यक्त केला.
मुंबईत रेणू यांच्या मालकीचं बुटिक असल्याची माहिती आहे. रेणू यांचे जावई इस्तंबुलमध्ये दाखल झाले आहेत. तर त्यांच्या मुलीने परराष्ट्र मंत्रालय आणि तुर्कीतील भारतीय दूतावासाकडे मदत मागितली आहे.