Mumbai kj somaiya college: मुंबईतील के. जे. सोमय्या कॉलेजच्या शिबिरात विद्यार्थ्यांना अर्ध नग्न करून मारहाण झाल्याचं प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाबाबत माहिती प्राप्त होताच विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. संबंधित प्राध्यापकावर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आली आहे. संबंधित प्राध्यापकावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनांनी दिला आहे. के जे सोमय्या कॉलेजच्या शिबिरात विद्यार्थ्यांना अर्ध नग्न करून मारहाण झाल्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी कॉलेजकडून झाली आहे. नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन कॉलेज प्रशासनाकडून देण्यात आले आहे. 


मुंबईच्या पूर्व उपनगरातील नामांकित कॉलेजच्या के जे सोमय्या कॉलेज मधील प्राध्यापकाकडून एका शिबिरात विद्यार्थ्यांना अर्ध नग्न करून मारहाण झाल्याची माहिती प्राप्त होताच, विद्यार्थी संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. या कॉलेजच्या प्राध्यापकाकडून शिबिरात विद्यार्थ्यांना अर्धनग्न करून मारहाणीची चौकशी करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवक काँग्रेसकडून गृहमंत्री , मुख्यमंत्री मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू व प्रकुलगुरू यांना पत्र पाठवले आहे. 


डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात डहाणू येथे शिबिरासाठी गेले असता कॉलेजच्या प्राध्यापकांनी या विद्यार्थ्यांना मध्यरात्री अर्धनग्न करून मारहाण केली. इतकेच नाही तर अर्ध नग्न अवस्थेत त्यांना कडाक्याच्या प्रचंड थंडीत दोन-तीन तास उभे करून ठेवण्यात आले, अशी माहिती विद्यार्थी संघटनांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे संबंधित प्राध्यापक आणि कॉलेज प्रशासन यांची चौकशी करून या प्रकरणात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटना करत आहेत. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. 


यावर अशा प्रकारची तक्रार कॉलेजला प्राप्त झाली असून नियमानुसार या प्रकरणात कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया कॉलेज प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आम्ही पुष्टी करतो की घटनेची आम्हाला तक्रार करण्यात आली होती आणि आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. आम्ही नियमांनुसार कारवाई करू असे कॉलेजच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.