Mumbai Kandivli Fire: मुंबईच्या कांदिवली परिसरात काल (बुधवारी, ता24) सकाळी सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना घडली. यामध्ये अनेक जण होपरळून गंभीर जखमी झाले आहेत. या सगळ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पूर्वेला असणाऱ्या मिलिटरी रोडवरील राम किसन मेस्त्री चाळीत बुधवारी सकाळी 9 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास गॅसचा पाईप लीक (Gas Leakage) झाल्यामुळे मोठा स्फोट (Mumbai Gas blast) झाला. या स्फोटानंतर घटनास्थळी आग लागली. मुंबई अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. ही आग ग्राउंड +१ मजल्याच्या दुकानात लागली होती. यात वीजजोडणी, एलपीजी गॅस सिलिंडर, रेग्युलेटर, गॅस स्टोव्ह यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. आगीत काही जण भाजले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी बहुतांश जण 85 ते 90 टक्के भाजले आहेत. (Mumbai Fire news) यामध्ये रक्षा जोशी देखील 90 टक्के भाजल्या गेल्या आहेत. ‘आईला खूप त्रास होतोय का? आई बरी होईल ना, तिला काही होणार नाही ना’ सिलिंडर स्फोटामध्ये गंभीररित्या भाजलेल्या रक्षा जोशी यांची मुलं असे प्रश्न रडवेल्या अवस्थेत डॉक्टरांना विचारत होती.
Mumbai Gas blast: रक्षा जोशी मेस्त्री चाळ येथे पोळ्या करण्यासाठी गेल्या...
काल (बुधवारी) सकाळी रक्षा जोशी नेहमीप्रमाणे कांदिवलीतील रामकिशन मेस्त्री चाळ येथे पोळ्या करण्यासाठी गेल्या होत्या. त्या मागील सात ते आठ वर्षांपासून त्या ठिकाणी काम करत होत्या. सकाळी नऊच्या सुमारास अचानक त्या ठिकाणी सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये जोशी गंभीर जखमी झाल्या. पुढच्या पंधरा मिनिटांतच त्यांच्या मुलांनी घटनास्थळी पोहचली. परिसरात एकच गर्दी झालेली होती. पोलिसांना पाहून रक्षा जोशी यांची मुलं अधिक भेदरून गेली. आजूबाजूच्या परिसरातूनही नेमकं काय झालं आहे, हे पाहण्यासाठी सर्वसामान्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यातून वाट काढत पुढे गेल्यानंतर मुलांना आपल्या आईला शताब्दी रुग्णालयात उपचारांसाठी पाठवल्याची माहिती मिळाली.
Mumbai Gas blast: पण आता सगळंच चित्र पालटलं होतं
दोन्ही मुल तातडीनं हॉस्पीटलला गेली, तिथे डॉक्टरांनी त्यांना रक्षा या 90 टक्के भाजल्याचं सांगितलं. कस्तुरबा रुग्णलयात वैद्यकीय उपचारासाठी नेण्याचा सल्लाही त्यांना दिला. कोणताही विचार न करता भाऊ बहिणीनं आईला पुढच्या उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलं. दहा दिवसांपूर्वीच रक्षा यांचा मुलगा हित याला एका खासगी कंपनीमध्ये नोकरीला लागला. त्यामुळे आता आईवर असलेला ताण थोडा कमी होईल, अशी त्यांना आशा वाटत होती, पण आता सगळंच चित्र पालटलं होतं, आता आईचे काय होईल, या चिंतेने दोन्ही मुलं व्याकूळ झाली होती.
कांदिवली पूर्वेकडे हनुमाननगर येथे हित हा आपली आई आणि बहिणीसोबत राहतो. त्यांच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर कुटुंबाचा गाडा ओढण्याची संपूर्ण जबाबदारी आईवर आली. वडील रिक्षा चालक होते. ते गेल्यानंतर रक्षा यांनी मोठ्या कष्टाने मुलांना मोठं केलं. मात्र आता आईची अवस्था पाहून ही लेकरं घाबरली.