Mumbai Accident :  मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावर एक कार चालकाने दोघांना धडक दिली. या अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी धडक दिलेली कार शोधून काढली असून आरोपींचा शोध सुरू आहे. कारच्या धडकेत जखमी झालेल्या दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 


आज सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बीकेसी कनेक्टर उड्डाणपूलावरून एक कार चालक आणि त्याच्यासोबत असलेला सहप्रवासी असे दोघे जण ठाण्याच्या दिशेने निघाले होते. मात्र कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. या कारने एव्हराडनगर बस स्टॉपवर उभे असलेल्या दोघांना धडक दिली. या धडकेत जखमी झालेल्या दोघांना तातडीने शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात बाबासाहेब नाथा काळे (वय ५५) ठार झाले असून अपघातात ठार झालेल्या दुसऱ्या व्यक्तीची ओळख पटली नाही. या व्यक्तीचे वय अंदाजे 60 वर्षे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


या अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आणि कार गाडी नेहरूनगर येथील शिवसृष्टी येथील महापालिकेच्या शाळेजवळ सोडली. या कारचालकाने बाजूच्या कारचे कव्हर टाकून अपघातग्रस्त कार लपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ही कार शोधली असून ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.