मुंबई : गोरेगावात आरे कॉलनीच्या जंगलात डोंगराला लागलेली आग अजून पूर्णपणे विझत नाही तोपर्यंत पवई परिसरात चक्क डोंगर हरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. होय...डोंगर हरवलाय, ऐकून आश्चर्य वाटलं असेल? पण खरं आहे. तशी तक्रार एका स्थानिकाने पोलिसात दिली आहे.

काही महिन्याभरापूर्वीचा पवईतला हा डोंगर हिरवागार होता. आता हा डोंगरच दिसेनासा झाला आहे आणि म्हणूनच हा डोंगर हरवल्याची तक्रार एका पर्यावरणवाद्याने चक्क पोलिसात दिली आहे...

गोरेगावच्या आरे जंगलात अख्खा डोंगर तब्बल सहा तास जळत होता. आता ऐन हिवाळ्यात डोंगराला आग लागल्याने संशयाचा धूर  येणारच. कारण अशाच पद्धतीने मुंबईतले अनेक डोंगर हळूहळू नष्ट होत चालले आहेत. आता याच डोंगराचं घ्या ना? काही महिन्यांपूर्वी या डोंगरावर अनेक झाडं आणि हिरवळ होती. इथे विविध जातींचे पक्षी आणि साप-मुंगुसासारखे वन्य जीव आढळायचे, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. पण गेल्या वर्षभरात जेसीबी-डंपरने अख्खा डोंगर पोखरुन गायब केल्याचं चित्र सध्या समोर आहे.

काही खासगी विकासक आणि भूमाफिया प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने पर्यवरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवत असल्याचा आरोप होत आहे. इतकंच काय तर स्वतः प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्थानिक पोलिसांना या अनियमिततेविरोधात कारवाई करण्याचा सूचना करुनही पोलीसांकडून कानाडोळा केल्याचं स्पष्ट होतं आहे

त्यामुळे आपल्या सुख-सुविधांसाठी नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास करुन उभारलेल्या या आलिशान टाऊनशिप्सची किंमत आपल्या भावी पीढीने फेडायची का हा प्रश्न आपण स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.

पाहा व्हिडीओ