Mumbai: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. सहा फुटांपेक्षा उंच मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. यासंदर्भातील राज्य सरकारची नियमावलीही न्यायालयाने स्वीकारली आहे.

Continues below advertisement


मुंबईचा गणेशोत्सव आणि येथील गणेश विसर्जनाच्या मिरवणुका देशभरात लोकप्रिय आहेत. येथील विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी मुंबईकरांसह देशभरातून नागरिक येत असतात. तर, अलिकडच्या काळात डिजिटल माध्यमांतूनही हे लाईव्ह प्रक्षेपण पाहिले जाते. त्यात, लालबागच्या राजाचे मुंबईतील गिरगाव चौपाटीवर विसर्जन होत असते. 


न्यायालयाने नेमकं काय म्हटलंय?


न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचं विसर्जन मात्र केवळ कृत्रिम तलावांमध्येच करणं बंधनकारक असेल. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुरेशी व्यवस्था करावी, अशी सूचना न्यायालयाने केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आणखी एक महत्त्वाचा आदेश दिला असून, विसर्जनानंतर दुसऱ्याच दिवशी समुद्रकिनारे आणि इतर नैसर्गिक जलस्रोत परिसरांची स्वच्छता करणं स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक करण्यात आलं आहे. यामुळे पर्यावरण रक्षणासोबतच सार्वजनिक आरोग्याचीही काळजी घेतली जाणार आहे.


पुढील माघी गणेशोत्सवापर्यंत निर्णय लागू


.हा दिलासा पुढील वर्षी होणाऱ्या माघी गणेशोत्सवापर्यंत लागू राहणार आहे. त्यानंतर यासंदर्भात पुढील धोरण ठरवण्यात येईल, असंही न्यायालयाने नमूद केलं आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून सहा फुटांपेक्षा मोठ्या मूर्ती विसर्जनावर अडचणीत सापडलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांना दिलासा मिळाला आहे. पर्यावरणाचा समतोल राखत विशिष्ट उंचीच्या घरगुती गणेशाच्या मूर्ती कृत्रिम तलावात  तर सार्वजनिक गणेशोत्सव (Ganeshotsav) मंडळाच्या मोठ्या मूर्ती या परंपरागत समुद्रात विसर्जन करण्यात येतील व पर्यावरणाबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असे प्रतिज्ञापत्र काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. आता सहा फुटांपेक्षा उंच मूर्त्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करता येणार आहेत.