मुंबई : खड्ड्यांनी आणखी किती जणांचा बळी घेतल्यानंतर मुंबई आणि राज्यातल्या रस्त्यांची अवस्था सुधारणार, असा परखड सवाल विचारत मुंबई उच्च न्यायालयानं यंत्रणांची कानउघडणी केलीय.


सध्या मुंबईतल्या रस्त्यांची खड्ड्यांमुळं अक्षरशः चाळण झालीय. तर नागपूर आणि कल्याणमध्ये खडड्यांमुळं दोघांना जीव गमवावा लागलाय. राज्यातल्या रस्त्यांच्या या दुरवस्थेमुळं मुंबई उच्च न्यायालयानं सुओ मोटो याचिका दाखल करून घेतलीय.

या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं पालिका आणि राज्य सरकारला चांगलच फटकारलं आहे. लोकांना चांगल्या दर्जाचे रस्ते देणं, हे सरकारचं कर्तव्य असल्याची आठवण उच्च न्यायालयानं करून दिली आहे.

काल 24 तासांच्या खड्ड्यांमुळे दोघांचा बळी गेला होता. नागपुरात सकाळी खड्ड्यांमुळे 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर भिवंडीमध्ये खड्ड्यात दुचाकी आदळून 16 वर्षीय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला.

तर काही दिवसांपूर्वी पालघरमधील खड्ड्यांमुळे एका प्रसिद्ध महिला बाईक रायडरचा मृत्यू झाला होता. जागृती होगाळे असं मृत बुलेटस्वार बाईक रायडरचं नाव होतं.

जागृती होगाळे या गृहिणी असल्या, तरी मुंबईमध्ये बाईकरनी नावाच्या ग्रुपची सक्रीया सदस्य होत्या. जागृती होगाळे ज्या महिलांना बाईक रायडिंगची आवड आहे, अशा महिलांची मोट बांधून त्यांनी मोठमोठ्या मोहिमा आखल्या होत्या.

धक्कादायक बाब म्हणजे, जागृती होगाळेंच्या मृत्यूपूर्वी पालघर जिल्ह्यातल्या खड्ड्यांनी 4 चालकांचा जीव घेतला आहे. त्यानंतरही झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.

संबंधित बातम्या

राज्यात खड्ड्यांमुळे 24 तासात दोन बळी

महिलांना बळ देणाऱ्या लेडी रायडरचा खड्ड्यामुळे करुण अंत