मुंबई: जून महिन्यात पाठ फिरवणाऱ्या वरुणराजाने जुलै महिन्यात मुंबईसह आजुबाजूच्या परिसरावर कृपादृष्टी दाखवली होती. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत दमदार पाऊस झाला आहे. या वाढलेल्या पर्जन्यामानामुळे मुंबईला पाणीपुरवठा (Mumbai Water) करणाऱ्या तलाव आणि धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मे महिन्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांश तलावांमधील पाणीसाठा तळाला पोहोचला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने शहर आणि उपनगरात 10 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला होता. पाऊस सुरु झाल्यानंतरही पाणीकपात सुरुच होती. मात्र, आता मुसळधार पावसामुळे (Mumbai Heavy Rain) मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्याने 50 टक्क्यांची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे मुंबईतील पाणीकपात लवकरच रद्द होण्याची शक्यता आहे.
वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमधून मुंबईला पाणीपुरवठा केला होता. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे या सर्व तलावांमधील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तुळशी आणि पवई तलाव दुथडी भरु वाहू लागले होते. मुंबईत गेल्या आठवड्यात सलग पाऊस सुरु होता. त्यामुळे सध्याच्या घडीला मुंबईतील सात जलाशयांमध्ये मिळून 53.12 टक्के पाणीसाठी जमा झाला आहे. हे पाणी मुंबईला पुढील 200 दिवस पुरेल.
पुढील काही दिवस जोरदार पाऊस बरसत राहिल्यास हा पाणीसाठा आणखी वाढू शकतो. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका या परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या दोन दिवसांत पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्याची शक्यता आहे. हा मुंबईकरांसाठी मोठा दिलासा ठरु शकतो. यासंदर्भात जलविभागाची आयुक्तांसोबत लवकरच बैठक पार पडणार आहे. त्यामुळे आता या बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहावे लागेल.
वारणा धरणाच्या पाणीपातळीत वाढ
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे. जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता आज सकाळी ११.०० वा. धरणांतून चालू असलेल्या १६४८ क्युसेक विसर्गात वाढ करुन वक्र द्वार मधून २००० क्युसेक व विद्युत जनित्र मधून १६४८ क्युसेक असे एकुण ३६४८ क्युसेक नदी पात्रात सोडण्यात येणार आहे.त्यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होणार आहे .त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
आणखी वाचा
Mumabi Tulsi Lake: आनंदाची बातमी! मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा पहिला तलाव भरला