केतन तिरोडकरांविरोधात हायकोर्टाची सुमोटो अवमान याचिका
एबीपी माझा वेब टीम | 12 Apr 2017 03:59 PM (IST)
मुंबई : मुंबई हायकोर्टाने आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांच्याविरोधात सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. सोशल मीडियावरुन न्यायवस्थेवर द्वेषयुक्त भावनेतून टीका केल्याने तिरोडकरांविरोधात हायकोर्टाने हे पाऊल उचललं आहे. मुंबई हायकोर्टाने तिरोडकरांविरोधात सुमोटा दाखल करुन घेतल्याची माहिती पीटीआयने दिली. त्याचसोबत 16 जूनच्या सुनावणीला केतन तिरोडकर हजर राहतील, याची जबाबदारी मुंबई हायकोर्टाच्या पूर्ण पीठाने मुंबई पोलिस आयुक्तांवर सोपवली आहे. न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस तिरोडकरांना देऊन, ते 16 जूनच्या सुनावणीला हजर राहतील याची जबाबदारी मुंबई पोलिस आयुक्तांनी घ्यावी, असेही पूर्ण पीठाने सांगितले. हायकोर्टाच्या पूर्ण पीठात मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लुर, न्या. अभय ओक, शंतनू खेमकर, एस. सी. धर्माधिकारी आणि आर. एम सावंत यांचा समावेश आहे. कोर्टाचा अवमान केल्याबाबत आलेल्या नोटिशीला आपल्या वकिलाद्वारे प्रतिज्ञापत्र दाखल करुन, तिरोडकरांनी न्यायवस्थेवर सोशल मीडियावरुन अवमानकारक टीका केल्याचे आरोप फेटळले.