मुंबई : जर तुम्ही कोकणातून मुंबईकडे किंवा मुंबईकडून कोकणाकडे प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. कोकण आणि रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची (Mumbai Goa Highway) पूर्णपणे दाणादाण उडाली आहे. पावसाचा जोर इतका भीषण आहे की, गेल्या 30 तासांहून अधिक काळापासून या महामार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली असून रायगड जिल्ह्याची एकप्रकारे नाकाबंदी झाली आहे.
महामार्गावर अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून, डोंगराळ भागातून दरडी कोसळल्याने आणि मोठ्या प्रमाणावर चिखल रस्त्यावर आल्याने प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून वाहतूक पूर्णपणे थांबवली आहे. महामार्गावर वाहनांच्या अनेक किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Raigad Highway Blocked : पळस्पे ते सुकेली खिंडीपर्यंत महामार्ग बंद
मुसळधार पावसामुळे रायगडचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या पनवेल जवळील पळस्पे (Palaspe) फाट्यापासूनच कोकणाकडे जाणारी वाहतूक रोखण्यात आली आहे. महामार्गावरील वाकण आणि सुकेली खिंड (Sukeli Khind) या परिसरामध्ये डोंगरावरून आलेले पाणी आणि मुसळधार पावसामुळे रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे. छातीभर पाणी साचल्याने कोणतीही वाहने पुढे जाणे शक्य नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून रविवारपासूनच हा मार्ग प्रशासनाने बंद केला आहे.
तर दुसरीकडे रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या कशेडी घाटातील (Kashedi Ghat) दिवाण खवटी या ठिकाणी सोमवारी सकाळी एक महाकाय दरड कोसळली आहे. मोठे दगड आणि मातीचा मोठा ढिगारा थेट महामार्गावर आल्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी आणि गोव्याच्या दिशेने जाणारी दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मात्र, दक्षिण रायगडमधील स्थानिक अंतर्गत वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे.
Mumbai Goa Highway Landslide : 30 तासांपासून हजारो प्रवासी अडकले
मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या 30 तासांपासून वाहने जागेवरच उभी असल्यामुळे हजारो प्रवासी आणि वाहनचालक महामार्गावर अडकून पडले आहेत. अनेक किलोमीटरपर्यंत लागलेल्या वाहनांच्या रांगांमुळे एसटी बसेस, खाजगी ट्रॅव्हल्स आणि कारमधील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. यामध्ये अडकलेल्या लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अन्न, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधा मिळणे देखील कठीण झाले आहे. स्थानिक नागरिक आणि काही स्वयंसेवी संस्था अडकलेल्या प्रवाशांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करत आहेत.
सतत कोसळणारा मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि डोंगराळ भागातील दरडी कोसळण्याचा सातत्याने वाढणारा धोका यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलीस प्रशासनाने काही ठिकाणी वाहतूक तात्पुरती थांबवून वाहने सुरक्षित स्थळी वळवली आहेत. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी पावसामुळे कामात मोठा अडथळा येत आहे. जोपर्यंत महामार्ग पूर्णपणे सुरक्षित होत नाही, तोपर्यंत प्रवाशांनी या मार्गाने प्रवास करणे टाळावे, असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ही बातमी वाचा:
