मुंबईत साडेचार वर्षांच्या चिमुकलीवर शाळेतील सेविकेकडून अत्याचार
एबीपी माझा वेब टीम | 23 Apr 2018 06:07 PM (IST)
मुंबईतील एका शाळेत साडेचार वर्षांच्या चिमुरडीचं शाळेतील सेविकेनेच लैंगिक शोषण केल्याचा आरोप होत आहे.
प्रातिनिधीक फोटो
मुंबई : मुंबईतील एका शाळेत साडेचार वर्षांच्या चिमुरडीचं शाळेतील सेविकेनेच लैंगिक शोषण केल्याचा आरोप होत आहे. माजगाव भागातील सेंट पीटर शाळेत हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आहे. लिली लोबो नावाची 59 वर्षीय सेविका गेल्या आठवड्यापासून साडेचार वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करत होती. चिमुरडीने रविवारी आपल्या पोटात दुखत असल्याचं सांगितल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तपासणीसाठी रुग्णालयात नेलं, तेव्हा चिमुकलीच्या गुप्तांगावर जखम झाल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. त्यावेळी मुलीने शाळेत घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. आरोपी सेविका गेल्या आठवड्याभरापासून चिमुरडीवर अत्याचार करत असल्याच समोर आल्याने शाळेत एकच खळबळ उडाली आहे. सेविकेला या प्रकरणानंतर तात्काळ शाळेतून काढून टाकण्यात आलं असून ती गेल्या 20 वर्षांपासून शाळेत काम करत होती. या प्रकाराबाबत पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी भायखळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.