मुंबई : मुंबईच्या परळमधील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत चौघांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. यापैकी एका वृद्ध महिलेचा आणि एका पुरुषाचा लिफ्टमध्ये अडकल्याने गुदमरुन मृत्यू झाला. हे दोघेही बाराव्या मजल्यावर राहत होते. चौघांचे मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी केईएम रुग्णालयात पाठवले आहेत.
दुसरीकडे अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. तसंच अडकलेल्या इतर लोकांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. आगीत इमारतीच्या वरच्या मजल्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
परेल पूर्वमधील हिंदमाता परिसरातील 17 मजली क्रिस्टल टॉवरच्या बाराव्या मजल्यावर आज सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 गाड्या आणि सहा पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.
दरम्यान, आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही रहिवासी इमारत असल्याने काही जण अडकले अडकले. वृद्ध, महिला आणि मुलांसंह सगळ्यांना क्रेनच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. त्यापैकी आठ जणांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.