Mumbai Dahi Handi 2022 : दहीहंडीत डोक्याला मार लागून दोन गोविंदा गंभीर जखमी झाले. त्यामुळे पोलिसांकडून आयोजकाला अटक करण्यात आली आहे. रियाज शेख यांनी या दहीहंडीचं आयोजन केलं होतं. पण सुरक्षेसाठी कोणतीही दक्षता न घेतल्यानं शनिवारी विलेपार्ले पोलिसांत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


दोन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या गोविंदाचा (Govinda) अखेर रविवारी मृत्यू झाला. संदेश दळवी (Sandesh Dalvi) असं या गोविंदाचं नाव. मुंबईतील (Mumbai) नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) संदेशनं अखेरचा श्वास घेतला. संदेश दळवी हा शिव शंभो गोविंदा पथकाचा (Shiv Shambho Govinda Pathak) गोविंदा होता. दहीहंडीला (Dahi Handi 2022) तो जखमी झाला होता. त्याला नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती शिवसेनेचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी दिली होती. 


विलेपार्ले पूर्व बाबरवाडा विमानतळ येथे दहीहंडी फोडत असताना संदेश सातव्या थरावरुन खाली कोसळला. त्याला कोणतीही सरकारी मदत मिळाली नाही. मुंबईतील कूपर रुग्णालयात दोन दिवस तो दाखल होता. सातव्या थरावरुन खाली कोसळल्यामुळे त्याच्या मानेला आणि मेंदूला जबर दुखापत झाली होती. अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. 


आयोजकांवर शनिवारीच गुन्हा झालेला दाखल 


दहिहंडीत डोक्याला मार लागून दोन गोविंदा गंभीर जखमी झाल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल झाला होता. विलेपार्ले पोलीस ठाण्यात हा गुन्हा आयोजांवर शनिवारी दाखल करण्यात आला होता. विलेपार्ले पूर्व येथे वाल्मिकी चौक येथे रियाज शेख यानं दहिहंडीचं आयोजन केलं होतं. मात्र गोविंदा पथकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कोणतीही काळजी न घेता, कोणतीही साधनसामग्री पुरवली नाही. यावेळी विनय शशिकांत रांबाडे (वय 20 वर्ष) संदेश प्रकाश दळवी (वय 24 वर्ष) हे दोघेजण दहीहंडी फोडत असताना खाली पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. 


संदेश दळवीच्या कुटुंबीयांना शिंदे सरकारकडून 10 लाखांची मदत


काल (मंगळवारी) राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेलं दहा लाख रुपयांचं अर्थसहाय्य दळवी कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आलं आहे. स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी संदेश दळवीच्या कुर्ला येथील घरी जाऊन अर्थसहाय्याचा धनादेश त्याच्या कुटुंबीयांच्या सुपूर्द केला. दळवी कुटुंबीयांचा थोरला लेक योगेश याला नोकरी मिळवून देण्याचाही आपण प्रयत्न करणार असल्याचं आमदार लांडे यांनी यावेळी सांगितलं.