मुंबई : दक्षिण मुंबईसह शहरातील बहुतांश शाळांनी मुंबईच्या डबेवाल्यांना विद्यार्थ्यांसाठी मधल्या सुट्टीत डबे आणण्यास मनाई केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हे पाऊल उचलल्याचं बहुतांश शाळांकडून सांगितलं जात आहे. मात्र मुंबईतील डबेवाल्यांना शाळांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेश देण्यास शाळांनी बंदी घातली असली तरी डबेवाल्यांची आजपर्यंतची प्रामाणिक सेवा आणि त्यांचे महत्व लक्षात घेता ही बंदी अयोग्य असून मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना तातडीने याबाबत संयुक्त बैठक घ्यावी असे निर्देश दिले आहेत. तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही याबाबत तातडीने लक्ष घालण्यााचे निर्देश शिक्षण उपसंचालकांना दिले आहे.
शहरातील अंदाजे 50 टक्के शाळा, त्यातही बहुतांश कॉन्व्हेंट शाळांमध्ये मुंबईच्या डबेवाल्यांना विद्यार्थ्यांसाठी डबे आणण्यास मनाई करण्यात आली आहे. आम्ही एकेकाळी शहरातील शाळांमध्ये जवळपास एक लाख डबे पुरवायचो. पण हाच आकडा आता 20 हजारांवर आला आहे,' अशी माहिती नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्सचे रघुनाथ मेडगे यांनी दिली.
एकीकडे शाळांमध्ये जंक फूडवर बंदी घातली आहे, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना आरोग्यदायी अन्नपदार्थ खाण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. कँटिन चालवणाऱ्या ठेकेदारांना नफा मिळवून देण्यासाठीच विद्यार्थ्यांना डबे पुरवण्यास मनाई केली आहे,' असा आरोप मुंबई डबेवाले संघटनेचे नेते सुभाष तळेकर आणि मेडगे यांनी केला.
पोलीस आयुक्त आणि शिक्षण उपसंचालकांनी तातडीने संयुक्त बैठक घ्यावी
आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आज प्रत्यक्ष भेटून तसेच पत्र लिहून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्तांनी तातडीने शाळा, डबेवाले यांच्याशी संयुक्त बैठक घेऊन यावर तोडगा काढावा असे निर्देश या पत्रावर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही शिक्षण उपसंचालकांनी याबाबत तातडीने लक्ष घालावे तसेच ही सेवा सुरू राहिल याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश दिले आहेत.
सुरक्षेच्या कारणावरुन डबेवाल्यांना शाळांमध्ये प्रवेशबंदी, तोडगा काढण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 May 2019 11:49 PM (IST)
मुंबई पोलीस आयुक्तांनी तातडीने शाळा, डबेवाले यांच्याशी संयुक्त बैठक घेऊन यावर तोडगा काढावा असे निर्देश या पत्रावर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -