Mumbai Crime : दिल्ली गुन्हे शाखेचे (Delhi Crime Branch) अधिकारी असल्याची बतावणी करुन चार अज्ञातांनी एका ज्वेलर आणि कर्मचाऱ्याचे अपहरण (Kidnap) करुन त्यांना लुटले. मुंबईतील सायन (Sion) परिसरातून त्यांचं अपहरण करण्यात आलं. अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडून तब्बल 2 कोटी 62 लाखांचे दागिने लुटून पळ काढला. ज्वेलर आणि कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर सायन पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.


2.62 कोटी रुपये किमतीचे हिरे आणि सोन्याचे दागिने घेऊन पळ 


संबंधित ज्वेलर हा मूळचा हैदराबादचा आहे. सायन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये नरेदी ज्वेलर्स चालवणारे संतोष नरेदी बुधवारी (31 मे) सकाळी हे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील भारत डायमंड बाजार इथे मौल्यवान वस्तू देण्यासाठी जात असताना ही घटना घडली. अपहरणकर्त्यांनी दोघांना भिवंडीत नेले, तिथे त्यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडून रोख रकमेसह सोन्याची बिस्किटे आणि सुमारे 2.62 कोटी रुपये किमतीचे हिरे आणि सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला, असंही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.


बस स्टॉपजवळ कार आली आणि...


याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, "संतोष नरेदी यांच्यासोबत दागिने बनवणारा कर्मचारी होता, ज्याचं नाव हरिराम घाटिया आहे. हे दोघे हैदराबादहून लक्झरी बसमधून मुंबईत आले आणि हायवे अपार्टमेंटजवळील डॉ बी ए रोडवरील बस स्टॉपवर उतरले. ते बसमधून उतरल्यानंतर काही वेळातच त्यांच्याजवळ एक चारचाकी गाडी थांबली आणि त्या वाहनातील चार जणांनी आपण दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचं सांगितलं आणि त्यांनी ओळखपत्रेही दाखवली. त्यांनी ज्वेलर आणि त्याच्या कर्मचार्‍यांला त्यांच्या वाहनात बसण्यास सांगितलं. त्यांनी नकार दिला, परंतु अहपरणकर्त्यांनी त्याला गाडीमध्ये बसण्यास भाग पाडलं आणि तिथून त्यांना घेऊन गेले."


"तुम्ही बेकायदेशीर दागिने घेऊन जात आहात आणि त्यामुळे तुम्हाला दिल्लीला घेऊन जात आहोत, असं आरोपींनी ज्वेलर आणि कर्मचाऱ्याला सांगितलं. परंतु आरोपी त्यांना भिवंडीला घेऊन गेले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी मुंबई-नाशिक महामार्गावर एका निर्जनस्थळी वाहन थांबवलं आणि दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर नरेदी आणि घाटिया यांना रस्त्यातच सोडून त्यांच्याकडील सुमारे 100  ग्रॅम वजनाची 20 सोन्याची बिस्किटे, पाच सोन्याचे आणि हिऱ्याचे हार, तीन बांगड्या, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि एक सोन्याची चेन, 27 लाख रोख रक्कम, 2000 रुपयांच्या 1350 नोटा आणि त्यांचे मोबाईल फोन असा एकूण 2 कोटी 62 लाख रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला."


ज्वेलर आणि कर्मचाऱ्याने बुधवारी (31 मे) रात्री घडलेल्या घटनेची माहिती सायन पोलिसांना दिली आणि तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


चोरीमध्ये ओळखीच्या आणि दुकानातील व्यक्तीचा हात असल्याचा संशय


"आम्ही गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु केला आहे. गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचा तपशीलही मिळत आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके अनेक ठिकाणी पाठवण्यात आली आहेत. या चोरीमध्ये ओळखीच्या आणि दुकानातीलच व्यक्तींचा हात असल्याचं दिसतं. त्यांना हे दोघे रोख रक्कम आणि दागिने घेऊन जात असल्याचे माहित होतं आणि त्यानुसारच त्यांनी दोघांचं अपहरण करुन दागिने लुटले," असं पोलिसांनी सांगितलं.


हेही वाचा


Mumbai Crime : मुंबईत आमदाराच्या घरात चोरी, चालकाने मित्राच्या मदतीने 25 लाख रुपये चोरले; 30 लाखांच्या खंडणीचीही मागणी