Mumbai Crime Newsनवी मुंबई: उलवे परिसरात राहणाऱ्या मावस भाऊ-बहिणीनेच एकमेकांवर जडलेल्या प्रेमातून लग्न केल्याची घटना समोर आली आहे. या लग्नाचा आणि प्रेमाचा अत्यंत धक्कादायक असा शेवट समोर आला आहे. काही महिन्यापूर्वी झालेल्या तरुणाच्या आत्महत्येनंतर (Crime News) पोलिसांच्या चौकशीत या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा झाला आहे. याप्रकरणी तरुणीवरती उलवे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उलवे परिसरात राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची (Crime News) घटना जानेवारी महिन्यात घडली होती. मात्र, त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट झाले नव्हतं.(Crime News)
पोलिसांचा तपास सुरू असताना तरुणाने त्याच्याच मावस बहिणीसोबत रजिस्टर पध्दतीने लग्न केल्याचं उघडकीस आलं. या घटनेची त्यांच्या कुटुंबीयांना माहिती नव्हती. काही दिवसांनंतर तरुणीला या लग्नामुळे आपली समाजात बदनामी होईल अशी भीती वाटू लागली. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाले. यादरम्यान तरुणीने दुसऱ्या मुलासोबत रजिस्टर लग्न केल्याचंही तरुणाला समजलं. त्यामुळे मानसिक तणावात असलेल्या त्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येनंतर पोलिसांकडून मित्र परिवाराकडे चौकशी सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला, त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. (Crime News)
प्रियकराच्या आत्महत्येने बसला धक्का; प्रेयसीनेही संपवलं जीवन
प्रियकराने आत्महत्या केल्याने हा धक्का सहन न झाल्याने अल्पवयीन प्रेयसीनेही आत्महत्या केल्याची घटना नायगाव येथे घडली. जितेंद्र वर्मा (24) असे प्रियकराचे नाव आहे. जितेंद्र हा त्याच्या प्रेयसीला लिव्ह इनमध्ये राहण्याचा आग्रह करत होता. मात्र, तिने नकार दिल्याने शनिवारी जितेंद्रने आत्महत्या केली, तर रविवारी प्रेयसीने आत्महत्या केली. जितेंद्र कोल्ही गावातील अरविंद चाळीत राहात होता, तर अल्पवयीन प्रेयसी शिक्षण घेत होती. जितेंद्रला प्रेयसीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे होते. त्यासाठी तो तिला आग्रह करत होता. मात्र, ती त्यासाठी तयार नव्हती. शनिवारी प्रेयसी जितेंद्रला भेटायला त्याच्या घरी गेली होती. त्यावेळी जितेंद्रने तिला 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहण्याचा आग्रह केला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला.
तू 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहा, नाही तर मी आत्महत्या करेन, असे जितेंद्र तिला सांगत होता. परंतु, तिने त्याचे बोलणे मनावर घेतले नाही. त्याने रात्री घरातील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा प्रकार प्रेयसीला समजताच तिला मोठा धक्का बसला. ती नैराश्यात गेली. तिच्या कुटुंबीयांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ती धक्क्यातून सावरली नाही. याच नैराश्यातून तिने रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
