Mumbai Crime News : मुंबई शहरामध्ये विविध नामांकित कंपनीच्या दुधामध्ये अशुध्द पाणी भरून भेसळयुक्त दूधाची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. मुंबई पोलिसांच्या सी बी कंट्रोल आर्थिक गुन्हे शाखेनं सहा जणांना अटक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं दुधाची भेसळ करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी सहा पथक नेमली होती. पोलिसांनी गुरुवारी शाहूनगर, धारावी या परिसरात कारवाई करत भेसयुक्त करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. ज्यामध्ये 1 हजार 10 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आलं. या जप्त केलेल्या भेसळयुक्त दुधाची किंमत 60 हजार 600 इतकी आहे.


मुंबई शहरात चालू असलेल्या बेकायदेशीर व अवैद्य धंदयावर बेधडक कारवाई केली. मुंबई शहरातील शाहूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ए. के. गोपाळनगर येथील झोपडपट्टीतील काही घरांमध्ये गोकुळ, अमूल, या नामांकित कंपनीच्या दुधात अशुध्द पाणी भरून नागरीकांना विक्री करीत आहेत, अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. 


प्राप्त माहितीची शहानिशा करण्यासाठी गुरुवारी ए.के. गोपाळनगर, संत कबीर मार्ग, 60 फिट रोड, धारावी येथे सी.बी. कंट्रोल, आर्थिक गुन्हे विभाग, मुंबई या विभागाने एकूण 06 वेगवेगळी पोलीस पथके तयार करून सदर घरांमध्ये छापा कारवाई केली. सदरच्या घरात दुधाच्या भरलेल्या पिशव्या व अस्वच्छ वापरलेल्या रिकाम्या पिशव्या तसेच भेसळयुक्त दुधाने भरलेल्या प्लॅस्टीकच्या बादल्या, पेटत्या मेणबत्त्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टीकचे नरसाळे इ. साहित्य मिळाले. त्यापैकी काही पिशव्या हातात घेवून त्याची पाहणी केली असता, त्या पिशवीचे कोपऱ्यावर असलेल्या सीलच्या ठिकाणी कापलेल्या दिसून आल्या. त्यात अशुध्द पाणी भरून दूधात भेसळ करीत असल्याचे समोर आले. 


सदर कारवाई दरम्यान घरामध्ये गोकुळ, अमूल या नामांकित कंपनीचे 60 हजार 600 रुपये किंमतीचे एकूण एक हजार 10 लिटर भेसळयुक्त दूध मिळून आले. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून पंचनाम्याअंतर्गत परिक्षणासाठी नमुने घेण्यात आले. सदर छापा कारवाईमध्ये एकूण 06 जणांना घेण्यात आले. त्यानंतर सरकारतर्फ फिर्याद देवून शाहूनगर पोलीस ठाणे येथे 299 /22 कलम 272, 273,481,482, 485, 420, 34 सह अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 कलम 3 (1) (1), 3(1) (ZZ)3 (1) (2) x, 26 (2) (ii) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सहा आरोपीतांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सी.बी. कंट्रोल मुंबई करीत आहेत.