Mumbai News: मुंबईच्या सांताक्रुझ भागामध्ये (Mumbai Crime News) एका 85 वर्षाच्या वृद्ध  माणसाची त्याच्या घरात काम करणाऱ्या केअर टेकरने हत्या  केल्याची घटना घडली आहे. या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर महानगरांमध्ये एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  मुरलीधर पुरुषोत्तम नाईक  यांचे हात व पाय बांधून तोंडात रुमाल टाकून गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली आहे. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा संशय आहे.


 मुरलीधर पुरुषोत्तम नाईक 85 वर्ष हे त्यांच्या पत्नी उमा नाईक  यांच्यासोबत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेल्या अनेक वर्षापासून राहत होते. पती-पत्नी दोघेही व्यवसायाने डॉक्टर होते. मुरलीधर यांना दोन मुले आणि एक मुली असून ते मुंबईच्या विलेपार्ले, चेंबूर आणि नवी मुंबई भागामध्ये राहतात. वृद्ध दामापत्य हे एकटे राहत असल्याने त्यांची काळजी घेण्यासाठी एक केअरटेकर आणि एक गृहिणी नेमण्यात आली होती. घरातील मोलकरीण स्वयंपाक आणि साफसफाई करून निघून जायची तर केअरटेकर हा दिवस व रात्रं त्यांच्याबरोबर राहायचा.


केअरटेकर मुरलीधर नाईक यांच्यासोबत  बेडरूममध्ये झोपायचा. सकाळी स्वयंपाकासाठी   कामाला आल्यानंतर त्यांनी बेडरूमचा दरवाजा उघडा पाहिला.  मुरलीधर यांना मृतअवस्थेत पाहिल्यानंतर त्यांनी शेजारच्यांना कळवले. मग त्यांनी विलेपार्ले येथे राहत असलेल्या आपल्या मुलाला या संदर्भात माहिती दिली. मुरलीधर यांच्या मुलाने पोलिसांना या संदर्भात माहिती दिली व पोलिसांनी घटनास्थळी येऊन पुढील तपास सुरू केला. 


कोण आहे केअर टेकर?



  • कृष्णा मनबहादूर पेरियार 30 वर्ष असे या आरोपी केअर टेकर नाव होते 

  • आरोपी केअर टेकर कृष्णा याची 1 मे म्हणजे आठ दिवस अगोदर नियुक्ती करण्यात आली होती 

  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केअर टेकर हा गेल्या आठ दिवसापासून खाली उतरलाच नव्हता 

  • मध्यरात्री ही हत्या केल्यानंतर आरोपी कृष्णा हा फरार झाला

  •  त्यांने सोन्याची चेन व रुद्राक्ष माला चोरी केली आहे असा पोलिसांना संशय आहे.


सांताक्रुझ पोलिसांनी यासंदर्भात विविध भादवि कलम प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलेला आहे.   सांताक्रुझ पोलीस त्यांच्या घरी असून यासंदर्भातची सर्व चौकशी करून पुरावे गोळा करण्याचा काम करत आहे. मुंबई गुन्हे शाखाही समांतर तपास करत आहे. केअरटेकरची नियुक्ती कोणत्या एजन्सी मार्फत करण्यात आली होती की अन्य कुणाकडून, याचा पोलीस तपास करत आहेत. आरोपीला शोधण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही मदत घेत आहे. मात्र कुठल्याही केअर टेकर  नेमणूक करायच्या अगोदर त्याची सविस्तर चौकशी करावी असा पोलिसांनी आवाहन केले आहे.