Mumbai : एका 45 वर्षीय महिलेची फसवणूक (Fraud)  केल्याप्रकरणी दिल्लीतून एका प्रसिद्ध यूट्यूबरला अटक केली आहे. मुंबईच्या सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पियुष कटियाल (Piyush Katiyal) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पियुष हा यूट्यूबवर असंख्य प्रॅक व्हिडिओ बनवतो. याच माध्यमातून सोशल मिडियावर त्याचे 5 लाखाहून अधिक फॅन आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पियुषचे व्हिडिओ पाहून 4 ते 5 महिन्यापूर्वी 45 वर्षीय महिलेने त्याचे अकाऊंट फॉलो केले होते. व्हिडिओवरील कमेंट पाहून पियुषने तिच्याशी संपर्क केला, कालांतराने दोघांनी एकमेकांना आपले नंबर शेअर केले होते. काही दिवसांनी विविध मेडिकल एमरजन्सीचे कारण सांगून पियुषने तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. महिलेनेही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मदत केली. मात्र, त्यानंतर विविध कारणं सांगून वारंवार पियुष महिलकडे पैसे मागू लागला. तसेच पैसे न दिल्यास स्वत:च्या मोबाइलवर चॅटिंगचे फोटो टाकून बदनामी करण्याची तर कधी पोलिसात ओळख असल्याची धमकी देऊ लागला. या महिलेकडून पियुषने अशा पद्धतीने अंदाजे 19 लाख उकळले होते. मात्र, पियुषची पैशांची मागणी थांबतच नसल्याचे पाहून अखेर महिलेने उत्तर सायबर पोलिसात धाव घेतली.

महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर उत्तर सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात करत पियुषला दिल्लीतून अटक केली आहे. पियुषला न्यायालयात हजर करत न्यायालयाने त्याला 5  दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

अंबाजोगाईत सेवानिवृत्त शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट, IPS विश्वास नांगरे पाटलांचे नाव घेत भामट्याने घातला 83 लाखांचा गंडा