मुंबई : मुंबईतील मुलुंड भागात एका कारमध्ये प्रेमी युगुलाचे मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. घरच्यांच्या विरोधामुळे दोघांनी विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मुलुंड न्यायालयाच्या परिसरात आज (बुधवारी) पहाटे एक कार खूप वेळ हेडलाईट सुरु ठेवून उभी असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कारची पाहणी केली. तेव्हा गाडीत एक तरुण आणि एका तरुणीचा मृतदेह आढळला.

पोलिसांनी कारच्या काचा फोडून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. पोलिसांना या कारमध्ये विषाची एक बाटलीही सापडली. यावरुन त्या दोघांनी आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं.

सलमान खान असं 25 वर्षीय तरुणाचं नाव असून तो मुलुंडमध्ये राहायचा, तर मनिषा नेगी ही 21 वर्षीय तरुणी ठाण्यात राहत होती. गेल्या चार वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध होता.

दोघांनी चार दिवसांपूर्वी घर सोडलं होतं. आज सकाळी त्यांचे मृतदेह कारमध्ये आढळले. त्यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.