मुंबई : सध्या राज्यातील कोरोना प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक जिल्ह्यांत निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. यासंदर्भात मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी एबीपी माझाशी बोलताना अनेक मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिलं आहे. 

Continues below advertisement

अस्लम शेख बोलताना म्हणाले की, "शाळा उघडण्याबाबत अनेक लोकांची वेगवेगळी मतं आहेत. लॉकडाऊन एकदम उघडणं योग्य नाही. आतापर्यंत सर्वांनी सहकार्य केलं आहे. पुढेही सर्वांच्या सहकार्याची गरज आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "मुंबईत जे निर्बंध लादण्यात आले होते. ते आता शिथिल केले आहेत. 4 वाजेपर्यंत रेस्टॉरंट्सना वेळ दिली आहे. 10 वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात यावा, अशी ही मागणी करण्यात येत आहे. यावर आज कॅबिनेटमध्ये चर्चा होऊ शकते. तसेच येत्या दोन दिवसांत यावर निर्णय होईल."

"मॉल उघडण्याबाबतही प्रश्न आहे. मॉलमध्ये अनेक दुकान असतात. त्यासोबतच इन डोअर गेम सुरु करण्याचीही मागणी केली जात आहे. यावर विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. केरळमध्ये जी परिस्थिती झाली आहे. ती परिस्थिती मुंबईत नको व्हायला म्हणून काळजी घेत आहोत. विरोधी पक्षांनी कितीही दबाव टाकला तरी त्यांच्या मनसारखं होणार नाही.", असंही अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं आहे. 

Continues below advertisement

राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराच्या नावात बदल करण्यात आल्याबाबत बोलताना अस्लम शेख म्हणाले की, "राजीव गांधी यांनी भारतात तंत्रज्ञान आणलं. काही लोक त्यांचं नाव हटवण्याचं काम करत आहेत. काही लोकांना काँग्रेस संपवायची आहे. पण जेवढा विरोध होईल, तेवढं नाव मोठं होईल." पुढे बोलताना, "ज्यांनी कधी क्रिकेट बघितलं नाही आणि हातात कधी बॅट पकडली नाही. त्यांचं नाव स्टेडियमला देण्यात आलंय" , असं म्हणत अस्लम शेख यांनी टोलाही लगावला आहे. 

कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांसाठी युनिव्हर्सल पास! 

लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. त्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा तयार करण्यात येणार असून, लवकरच ती सुरु करण्यात येणार आहे. पण ही यंत्रणा नक्की काम कशी करणार, याबाबत सर्वसामांन्यांच्या मनात गोंधळ आहे. त्याबाबतची माहिती जाणून घेऊया. 

लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेन प्रवासासाठी विशिष्ट पास देण्यात येणार आहेत. या पासवर क्यूआर कोड असणार आहे. हा पास ‘युनिव्हर्सल पास’ म्हणून ओळखला जाईल. हा पास लोकल ट्रेनसोबतच मेट्रो, मोनोरेल त्याचप्रमाणे मॉल किंवा इतर ठिकाणी सुद्धा चालू शकणार आहे.