मुंबई: शहरात एकीकडे गणेशोत्सवाची धूम सुरू असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या (Mumbai Corona) मृत्यूमध्ये वाढ होत आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये कोरोनामुळे 21 जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये होणारी वाढ कमी असली तरी दर दिवशी होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत मात्र वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  


मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईमध्ये गणेशोत्सवावर मर्यादा आल्या होत्या. या वर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा केला जात आहे. पण कोरोनाचे संकट अद्याप संपलेलं नाही. गणेशोत्सवामुळे मुंबईतील बाजारात, गणेश मंडळांच्या परिसरात लोकांची गर्दी जमत असून त्यावर कोणतेही नियंत्रण नाही. 


गेल्या सहा दिवसात किती मृत्यू झाले?


28 ऑगस्ट - 610 नवे रुग्ण, 93 टक्के रुग्णांमध्ये कोणतेही लक्षण नाही, तीन जणांचा मृत्यू


29 ऑगस्ट - 351 नवे रुग्ण, 90 टक्के रुग्णांमध्ये कोणतेही लक्षण नाही, तीन जणांचा मृत्यू


30 ऑगस्ट - 516 नवे रुग्ण, 94 टक्के रुग्णांमध्ये कोणतेही लक्षण नाही, तीन जणांचा मृत्यू


31 ऑगस्ट - 638 नवे रुग्ण, 93 टक्के रुग्णांमध्ये कोणतेही लक्षण नाही, चार जणांचा मृत्यू


01 सप्टेंबर - 272 नवे रुग्ण, 90 टक्के रुग्णांमध्ये कोणतेही लक्षण नाही, चार जणांचा मृत्यू


02 सप्टेंबर  - 402 नवे रुग्ण, 91 टक्के रुग्णांमध्ये कोणतेही लक्षण नाही, चार जणांचा मृत्यू


गेल्या काही दिवसांमध्ये ज्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे त्या सर्व रुग्णांना इतरही काही आजार होते असं समोर आलं आहे. यामध्ये डायबेटिस, उच्च रक्तदाब अशा गोष्टींचा समावेश आहे. तसेच या रुग्णांचं वयही 50 च्या वरती असल्याचं दिसून आलं आहे. 


मुंबईत शुक्रवारी 402 रुग्णांची नोंद झाली तर 676 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासांत तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,22,378 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98.0 टक्के इतका झाला. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,705 झाली आहे. सध्या मुंबईत 3,414 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, मुंबईत आढळलेल्या नव्या 402 रुग्णांमध्ये 366 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे.