मुंबई: सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी असून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात सहा रुपये प्रति किलो तर पीएनजीच्या दरात चार रुपये प्रति किलो कपात करण्यात आली आहे. 2 ऑगस्ट रोजी सीएनजीच्या दरात सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ करण्यात आली होती. आज मध्यरात्रीपासून हा नवा दर लागू करण्यात येणार आहे. आता या दरात पुन्हा कपात करण्याचा निर्णय महानगर गॅस लिमिटेडने (MGL) घेतला आहे. मुंबई आणि परिसरातील नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.
महानगर गॅस लिमिटेडने जारी केलेल्या नव्या दरानुसार आता ग्राहकांना सीएनजी 80 रुपये प्रति किलोने तर पीएनजी 48.50 रुपयांना मिळणार आहे. या नव्या दरानुसार, पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी 48 टक्के स्वस्त तर घरघुती एलपीजी सिलेंडरच्या तुलनेत पीएनजी 18 टक्क्यांनी स्वस्त मिळणार आहे. महानगर गॅस लिमिटेड ( MGL) ही मुंबईत सीएनजी आणि पीएनची पुरवठादार कंपनी म्हणून कार्यरत आहे.
या आधी वाढलेल्या किमती
या आधी मुंबईमध्ये सीएनजीचे दर 2 ऑगस्ट रोजी वाढले होते. त्यावेळी सीएनजीच्या दरात सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्याआधी सीएनजीचे दर 12 जुलै रोजी वाढले होते. त्यावेळी सीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ तर पीएनजीच्या दरात तीन रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यापूर्वी 29 एप्रिल रोजी सीएनजीच्या दरात चार रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
नागपुरात पेट्रोल आणि डिझेलपेक्षाही सीएनजी महाग
इंधनदरातील वाढीमुळे नागरिक त्रस्त असताना सीएनजीचा पर्याय वाहनधारकांसाठी होता. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे इंधनाचा स्वस्त पर्याय म्हणून सीएनजीकडे पाहिले जात होतं. मात्र सीएनजीच्या दरांतही झपाट्यानं होणारी वाढ नागरिकांची चिंता वाढवत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच पेट्रोल डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा सल्ला नागरिकांना देत असतात. मात्र गडकरींच्याच शहरात सीएनजीच्या दराचा भडका उडाला आहे. कारण नागपुरात सीएनजी पेट्रोल-डिझेलपेक्षाही महाग विकलं जात आहे. शहरात मोजकेच सीएनजीचे विक्रेते असून विदर्भातील इतर जिल्ह्यांपेक्षाही महाग सीएनजी नागपूरात विकलं जात आहे. नागपूरमध्ये CNG चा दर हा 116 रुपये प्रति किलो आहे. तर पेट्रोलचा दर हा 106 रुपये 5 पैसे आणि डिझेलचे दर 92 रुपये 60 पैसे आहे.