मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क परिसरात सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनात आता गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचं दिसतंय. अभिजीत दिपके यांच्याकडून सुरू असलेल्या आंदोलनात एका गटाने जय श्री रामाच्या घोषणा दिल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं. ज्या कार्यकर्त्यांनी या घोषणा दिल्या त्यांना पोलिसांनी बाजूला नेल्याने अनुचित घटना घडली नाही. दरम्यान, घोषणा देणारे कार्यकर्ते हे कोणत्या पक्षाशी किंवा संघटनेशी संबंधित आहेत हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा यासाठी कॉकरोच जनता पार्टीकडून शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करण्यात आलं. यादरम्यान, भगवे मफलर घातलेले काही कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्यांनी जय श्री रामाच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी यावेळी सतर्कता दाखवत या कार्यकर्त्यांना बाजूला नेलं. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
'ज्ञानू इट्स डन ब्रो' असं म्हणत सीजेपीनं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात तरुणाईच्या संतापाला वाट मोकळी करून दिली. सीजेपीच्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणींसह अनेक दिग्गजही उतरलेले दिसले. ज्ञानेश कुमारांचा राजीनामा, एसआयआर प्रक्रियेची सखोल चौकशी करा, 2023 चा निवडणूक आयोग कायदा रद्द करा या प्रमुख मागण्यांसह आंदोलक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले.
Delhi Jantar Mantar Protest : दिल्लीतही आंदोलनाची हाक
मुंबईत सीजेपीच्या आंदोलनाचा एल्गार सुरु असतानाच तिकडे नवी दिल्लीत जंतरमंतरचा परिसरही आंदोलनानं गजबजून गेला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमारांविरोधात आपनं आंदोलनाची हाक दिली. मात्र दिल्ली पोलिसांनी जमावबंदी लागू करत आंदोलनाला परवानगी नाकारली. सकाळपासूनच बॅरीकेडिंग करून जंतर-मंतरकडे येणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले. अनेक मेट्रो स्थानकंही बंद ठेवण्यात आली.
जमावबंदी झुगारून जंतरमंतरकडे निघालेल्या आपच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आल्यानं काही काळ तणावाचं वातावरण होतं. तर जंतरमंतर जाण्याचा आग्रह धरत आंदोलकांनी तिथेच घोषणाबाजी सुरू केली. 20 जुलैला संसदभवनावर निघालेल्या मोर्चात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. यात अनेक आंदोलक आणि पोलीस जखमीही झाले...यामुळे यावेळी पोलिसांनी जंतरमंतरवर आंदोलनासाठी परवानगीच नाकारली...त्यामुळे विरोधकांची पुढची रणनीती नेमकी काय असेल हे पाहावं लागेल.
ही बातमी वाचा:
