मुंबई : चर्चगेट रेल्वे स्थानकात आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. स्थानकातील मॉन्जिनिज केकशॉपमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली होती. त्यानंतर अग्निशमन दलाला ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं.  मात्र या आगीमुळे धुराचे लोट मोठ्या प्रमाणात उठल्याने प्रवाशांची एकच धावपळ झाल्याचं दिसून आलं. दरम्यानच्या काळात काही वेळेसाठी स्टेशनचे मुख्य गेट बंद करण्यात आलं होतं. ते आता पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.

चर्चेगेट स्टेशनमध्ये गुरुवारी संध्याकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी ही घटना घडली. आग लागल्यानंतर त्या ठिकाणी धुराचे लोट दिसायला लागले. या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी घरी परत जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी होती. त्याचवेळी ही आग लागल्याने स्टेशनमधील कॉरिडॉरमध्ये धूरच धूर दिसायला लागला. त्यानंतर लगेच कॉरिडॉर आणि त्याला जोडणारा भूयारी मार्ग बंद करण्यात आला. 

या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल त्या ठिकाणी लगेच पोहोचलं. त्यांनी काहीच वेळेत ही आग आटोक्यात आणली. ज्या केकच्या दुकानात ही आग लागली होती त्यामधील वस्तू या जळून खाक झाल्या आहेत. 

Mumbai Churchgate Station Fire : लोकल रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम नाही

एकीकडे ही आग लागली असली तरी दुसरीकडे लोकल सेवेवर मात्र जास्त काही परिणाम झाला नसल्याचं दिसून आलं. यावेळी स्टेशनबाहेरचा मुख्य रस्ता बंद करण्यात आला होता. तसेच चर्चेगेट स्टेशनचे मुख्य गेटही बंद करण्यात आलं होतं. नंतर आग आटोक्यात आणल्यानंतर हे गेट उघडण्यात आलं. 

या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. ही आग केवळ पाच मिनिटांत आटोक्यात आणल्याची माहिती त्यांनी दिली. 

Churchgate Station Fire : आग विझवल्यानंतरही धुराचा लोट कायम

चर्चगेट स्थानकाचा कॉरिडॉर हा बंद ठिकाणी असल्याने आग विझवल्यानंतरही त्यामध्ये धुराचा लोट कायम राहिला होता. तसेच स्टेशनच्या संपूर्ण परिसरात हा धुराचा लोट कायम होता. अनेक प्रवाशांना तोंडाला रुमाल बांधून पुढे जावे लागल्याचं चित्र होतं.