Mumbai Crime News: मुंबईतील वाकोला येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. समलैंगिक संबंधाचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत दोघांनी तब्बल 3 कोटी रुपयांची खंडणी (Extortion) उकळल्याचा प्रयत्न केला. मात्र सततच्या या मानसिक त्रासाला कंटाळून एका चार्टर्ड अकाउंटंटने (Chartered Accountant) टोकाचं पाऊल उचलत विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी दोघांविरोधात (Mumbai Crime) आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघांना अटक
मिळालेल्या माहितीनुसार, वाकोला परिसरात नामांकित चार्टर्ड अकाउंटंटला शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन करोडोंची खंडणी उकळणाऱ्या दोघांना वाकोला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पीडित तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोपही या दोघांवरती करण्यात आला आहे. राहुल शेरू पारवाणी (वय 26) आणि सबा इकबाल अहमद कुरेशी (22) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांच्याविरुद्ध वाकोला पोलीस ठाण्यात कलम 108, 308(2), 308(3), 3(5) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करून केलं ब्लॅकमेलिंग
प्राथमिक माहितीनुसार, चार्टर्ड अकाउंटंट राज मोरे (वय 32) हा आपल्या आईसोबत सांताक्रूझ परिसरामध्ये रहात होता. तर तो शीव येथील एका कंपनीत कामालाही होता. राज मोरे याची इन्स्टाग्रामच्या समाजमाध्यमावर राहुल पारवानी याच्यासोबत सप्टेंबर 2024 मध्ये ओळख निर्माण झाली. त्यानंतर त्या दोघांमध्ये मैत्री फुलली आणि त्यानंतर दोघे नियमित भेटू लागले होते. अशातच या दोघांचे शारिरीक संबंध निर्माण झाले. मात्र राहुलची सहकारी सबा कुरेशीने या शारिरीक संबंधाचा अश्लील व्हिडीओ बनवला. या व्हिडीओच्या आधारे राहुल आणि सबा हे दोघे राज मोरे याला ब्लॅकमेल करीत होते. त्यातूनच त्यांनी मोठ्या रकमेची मागणी केली होती. मात्र सततच्या त्रासाला कंटाळून चार्टर्ड अकाउंटंटने टोकाचं पाऊल उचललं आणि विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
राज मोरे याच आईच्या नावे भावनिक पत्र
राज मोरे याने आपलं जीवन संपवण्याआधी आईसाठी भावनिक नोट लिहली आहे, "माझी प्रिय आई, मला माफ कर, मी एक चांगला मुलगा नाही होऊ शकलो. तुला माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण मीच तुला एकटं सोडून जात आहे. मी माझ्या कर्माची फळं भोगतो आहे. देव तुला पुढच्या आयुष्यात माझ्यासारखा मुलगा कधीही देऊ नये. मी खूप वाईट वागलो आहे, पूनम मावशी, माझ्या आईची काळजी घ्या. माझी विविध खात्यांमध्ये पॉलिसी आहेत, ते पैसे घ्या आणि माझ्या आईला द्या. मला माफ करा," असे राजने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
वाकोला पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, "आरोपी राहुल परवानी लोखंडवाला परिसरातील एका लॉजमध्ये राहत होता. तो आणि सबा कुरेशी हे दोघे मिळून राजवर पैशासाठी दबाव टाकत होते. आम्ही त्यांच्या बँक खात्यांची तपासणी करत आहोत. त्यांनी 2024 पासून मोरेकडून घेतलेले पैसे कुठे वापरले, हे शोधत आहोत." तर चौकशीवेळी राहुल परवानीने पोलिसांना सांगितले की, त्याने राजकडून घेतलेले पैसे शेअर मार्केट आणि ऑनलाइन गेमिंगमध्ये गुंतवले. तसेच, त्याने दैनंदिन खर्चासाठीही ते वापरले. पोलिसांनी सांगितले की, राहुल परवानीने राज मोरेच्या नावावर बँकेतून SUV गाडीसाठी कर्ज घेतले. त्याचे हप्ते (EMI) सुद्धा राजच भरत होता.