मुंबई : शहरात कोरोना प्रतिबंध लसीकरण चाचणीमध्ये काही मध्यस्थी व्यक्ती स्वयंसेवक गोळा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. देशात कोरोना लसीकरण सुरू झालेलं असून कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सीन मान्यता प्राप्त लस सध्या पहिल्या टप्यात दिली जात आहे. तर इतर कंपन्यांच्या ट्रायल (चाचणीसाठी) स्वयंसेवक गोळा करून त्यांना चाचणीसाठी पाठवाले जात असल्याचे काही मध्यस्थीने कबूल केलं आहे.


देशभरात 16 जानेवारीपासून सिरमच्या कोव्हीशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सींन अशा मान्यताप्राप्त लसीच्या लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्यात मान्यताप्राप्त लस दिली जात असताना दुसरीकडे या व्यतिरिक्त इतर कंपन्यांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीसाठी चाचण्या सुरू आहेत. मात्र, त्यासाठी स्वयंसेवक म्हणजेच लसीच्या चाचणीसाठी स्वइच्छेने येणाऱ्या व्यक्तींना गोळा करण्याचे काम मुंबईत केलं जातंय. यामध्ये काही जण थर्ड पार्टी काम करत असल्याचा सुद्धा सांगितलं जात आहे.


या संदर्भात समोर आलेलं मोबाईल संभाषण वाचा..




  • रिपोर्टर - मला लसची चाचणी करायची आहे

  • मध्यस्थी - 4 दिवस थांबा मी सांगतो तुम्हाला कुठे करता येईल. तुम्हला येण्याजाण्याचे पैसे देऊ.

  • रिपोर्टर - काही पैसे घेणार का?

  • मध्यस्थी - नाही, पैसे नाही घेणार किंवा देणार नाही, फक्त देशसेवा म्हणून तुम्ही स्वतःहून चाचणीसाठी या.

  • रिपोर्टर - कोणत्या कंपनीची चाचणी आहे आणि कुठे?

  • मध्यस्थी - आहेत वेगवेगळ्या कंपन्या आहेत, अनेक ठिकाणी चाचणी करता येते.


हे वाचल्यानंतर तुम्हाला कळलं असेल, की हा व्यक्ती जरी देशसेवा म्हणून हे काम करा असं म्हणतोय तरी त्याला कोणत्या लसीची चाचणी होणार? याबाबत फारशी माहिती नाहीये. फक्त लोकांना लसीकरणाच्या चाचणीसाठी स्वयंसेवक गोळा करून त्यांना खाजगी-सरकारी रुग्णालयात पोहचवायचे काम अशाप्रकारे काहीजण करत आहेत. पण या व्यक्तींना हे काम दिलं गेलंय का? या कामासाठी त्यांची नेमणूक रुग्णालयात झालीय का? किंवा असे काम काही मध्यस्थी करत आहेत का? याबाबत सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या अधीक्षकाकडून आम्ही जाणून घेतले.


आम्ही असे कोणतेही मध्यस्थी नेमले नाहीत किंवा रुगणालाय कंपनी असे मध्यस्थी चाचणीसाठी नेमत नाही. थर्ड पार्टी थ्रू जर कोणी स्वयंसेवक येत असेल तर त्याबाबत कल्पना नाही. परंतु, लसीच्या चाचणीसाठी स्वतः डॉक्टर्सच पुढाकार घेतात किंवा माऊथ पब्लिसिटीने स्वयंसेवक चाचणीसाठी येतात, अशी माहिती सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी दिली.




  • रिपोर्टर - तुम्ही या प्रोसेसमध्ये आहात का?

  • मध्यस्थी - नाही, मी फक्त काम करतो. मित्रांना आपल्या सर्कलमध्ये चाचणीला पाठवतो.

  • रिपोर्टर - कुठे काम करता? कोणत्या हॉस्पिटलमध्ये?

  • मध्यस्थी - नाही, मी कुठे काम करत नाही.


यामध्ये स्वयंसेवकाकडून जरी काही जण पैसे घेत नसतील तरी थर्ड पार्टी 500 ते 2000 हजार रुपयापर्यंत पैसे एका स्वयंसेवकामागे घेत असल्याचं सांगितलं जात आहे. भारत बायोटेक, स्पुटनिक व्ही आणि सुरू होत असलेली झायड्स कॅडीला कंपनीच्या लसीच्या चाचणी होत आहेत. त्यामुळे सध्या जर तुम्हाला लसीकरणासाठी किंवा चाचणीसाठी आग्रह करत असेल किंवा स्वयंसेवक गोळा करण्याचे काम कोणी करत असेल तर सावध व्हा! कारण या कामामागे हा व्यक्ती आपला आर्थिक फायदा घेत असल्याचे समोर येत आहे.