BMC Election : मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासाठी संजय राऊतांची घाई? मविआचं काय होणार?
Mumbai Politics : महापालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत असं सांगत काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणुकीत स्वबळाची भाषा सुरू केली आहे.

मुंबई : मनसेला महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) घेण्यावरून गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा सुरू आहे. यामध्ये स्वतः राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाविकास आघाडीतील एक मोठा घटक असलेल्या काँग्रेस सोबत जाण्यास इच्छुक असल्याचं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं. मात्र याबाबत काँग्रेसने आपण आपली पुढील भूमिका लवकरच जाहीर करू असं म्हटलं. तर मनसेने काँग्रेसबाबत भूमिका हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेच घेतील असं म्हटलं.
या सगळ्या घडामोडींवरुन ठाकरेंची शिवसेना आणि यामध्ये विशेषतः संजय राऊतच राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतायेत का? काँग्रेस त्याला अनुकूल आहे का? राज ठाकरेंची यावर अधिकृत प्रतिक्रिया काय असणार? महाविकास आघाडीचे आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भवितव्य काय असणार? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
MNS On Alliance : मनसेचा निर्णय राज ठाकरे घेतील
एकीकडे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची युतीची चर्चा जोर धरत आहे. आता फक्त आता युती अधिकृतरित्या जाहीर होण्याची वाट पाहिली जात असताना मनसेने महाविकास आघाडी सोबत यावे अशी चर्चा सुद्धा दुसरीकडे सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील घटक असलेल्या काँग्रेस सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. मात्र यावर अधिकृतरित्या मनसेकडून प्रतिक्रिया आलेली नाही. उलट याबाबतचा सगळा निर्णय राज ठाकरे घेतील असं मनसे नेत्यांनी सांगितलं.
Congress On BMC Election : काँग्रेसचा स्वबळाचा नारा?
दुसरीकडे आज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सुद्धा राज्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. त्यामध्ये महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. सोबतच आघाडी संदर्भात मत जाणून घेतल्याची माहिती आहे. मात्र इकडे काँग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांनी "एकला चलो रे" चा सूर लावला.
महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर काँग्रेस लढली पाहिजे असं मत काही नेत्यांनी मांडल्याचं कळतंय. मनसेसोबत युतीला सुद्धा काँग्रेस सकारात्मक नसल्याचे चित्र आहे. याबाबत स्पष्टपणे कोणी नेते बोलले नसले तरी लवकरच आम्ही याबाबत निर्णय जाहीर करू असे सांगितले आहे.
महायुती विरोधात ताकद अधिक भक्कम व्हावी यासाठी महाविकास आघाडीचे ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस यांच्यासोबत मनसे सुद्धा यावी असे मत ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे. त्यासाठी ठाकरेंची शिवसेना मध्यस्थी करत असून दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, वेणुगोपाल यांच्याशी सुद्धा चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
ठाकरेंची शिवसेना आणि मनसे राज्यातील पाच महापालिकांमध्ये युती करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे एकीकडे शिवसेना आणि मनसेची युती होत असताना काँग्रेसने मात्र आपली कुठलीच भूमिका महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर केलेली नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी राहणार, नाही राहणार किंवा मग काही ठिकाणीच राहणार याबाबत स्पष्टता आलेली नाही. सोबतच मनसे महाविकास आघाडीत येणार का? या प्रश्न सुद्धा अनुत्तरीत आहे. यामध्ये काँग्रेसची भूमिका आणि मनसेची भूमिका ही महत्त्वाची ठरणारी आहे.
ही बातमी वाचा:



















