मुंबई : 29 ऑगस्टला मुसळधार पावसानं मुंबई ठप्प केली. मुंबईनं दीपक अमरापूरकरांसारखे विख्यात डॉक्टर गमावले. मुंबईकरांनी पावसाच्या नावानं लाखोल्या वाहिल्या. मात्र 29 ऑगस्टला प्रत्यक्षात मुंबई तुंबवली ती, मुंबईकरांनीच पोसलेल्या प्लॅस्टिकच्या भस्मासुरानं.


मुंबईतून प्लास्टिकला हद्दपार करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. प्लॅस्टिकबंदीची सुरुवात मुंबईतल्या 92 बाजारांपासून होणार आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीत 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर आधीपासूनच बंदी आहे. मात्र ही बंदी फक्त कागदोपत्री असल्याचं उघड झालं आहे.

29 ऑगस्टच्या मुसळधार पावसानं प्लॅस्टिक तुंबवणाऱ्या मुंबईकरांची पोलखोल केली.

30 ऑगस्टला मुंबई महापालिकेनं किती प्लॅस्टिक गोळा केलं?

उत्तर गोरेगाव परिसरातून 85 मेट्रिक टन

पूर्व चेंबूरमधून 80 मेट्रिक टन

कुर्ल्यातून 80 मेट्रिक टन

भांडुपमधून 75 मेट्रिक टन

दक्षिण कांदिवली मधून 75 मेट्रिक टन

अंधेरीमधून 75 मेट्रिक टन एवढा प्लॅस्टिकचा कचरा गोळा केला.

मुंबईला प्लॅस्टिकमुक्त करायचं असेल तर फक्त नियम करुन चालणार नाहीत. तर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणंही गरजेचं आहे. त्याहून महत्त्वाचं म्हणजे मुंबईकरांनी स्वतःहून प्लॅस्टिकबंदी करण्याचा निश्चय केला पाहिजे.