Mumbai BEST Strike :  मुंबईकर प्रवाशांची दुसरी लाइफलाईन असलेल्या बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप (BEST Bus Strike) तिसऱ्या दिवशीदेखील सुरू राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले. जवळपास 18 आगारातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केल्याने बस प्रवाशांचे हाल झाले. प्रवाशांच्या सोयीसाठी आज काही मार्गावर एसटी बसेसही चालवण्यात आल्या आहेत. उद्या, शनिवारीदेखील एसटी बसेस धावणार असल्याची माहिती बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली. 


आझाद मैदानात (Azad Maidan) बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी समाजसेविका प्रज्ञा खजूरकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.  त्यांना पाठिंबा देण्यासाठी 1 तारखेपासून घाटकोपर आगरमधील 280 कंत्राटी कर्मचारी संपावर जात आजाद मैदान गाठले होते. या संपाची या तीव्रता वाढत गेली आणि कंत्राटी तत्वावर असलेल्या मुंबईमधील विविध आगारातील कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत. वेतन, सुट्टी आणि इतर प्रश्नांवरून कंत्राटदारांसोबत याआधी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वाद निर्माण झाला होता. कंत्राटदारांकडून दुर्लक्ष होत असल्याने याआधीदेखील काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. आता, मात्र आझाद मैदानात सुरू असलेल्या उपोषणामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. आहे. 


आजच्या आंदोलनात एसएमटी, मातेश्वरी, टाटा, हंसा, ओलेक्ट्रा, आणि स्विच या कंत्राटदारांच्या कामगारांचा समावेश होता. असे असले तरी SMT, मातेश्वरी, हंसा या व्यवसाय संस्थेच्या  अनुक्रमे 76, 35 आणि 162 बस गाड्या प्रवर्तित करण्यात आल्याची माहिती बेस्टने दिली. संबंधित कंत्राटदारांविरोधात कंत्राटीच्या अटी व शर्ती  प्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच त्यांना त्वरित त्यांच्या कामगारांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली. बेस्ट उपक्रम आपल्या जास्तीत जास्त बस चालकांचा वापर करून जास्तीत जास्त बस गाड्या प्रवर्तित करीत आहेत. बेस्टच्या सेवेत असणाऱ्या चालक-वाहक, कर्मचाऱ्यांनी संप केला नसल्याचेही बेस्टने सांगितले. 


बेस्टच्या मदतीला एसटी धावली


प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळ बेस्टच्या मदतीला धावून आले. आज संध्याकाळपर्यंत 74 बसेस धावल्या. यामध्ये देवनार आगारासाठी 19, शिवाजीनगर 12, घाटकोपर 7, मुलुंड 15, गोराई 11 आणि मागाठणे 10 एवढ्या एसटी बसेस संबंधित आगारातून चालवण्यात आल्या. 


बेस्टच्या सहा आगारांसाठी डेपोला प्रत्येकी 25 याप्रमाणे 150 बसेस एसटीने पुरविलेल्या आहेत. बेस्टची वाहतूक सुरळीत होईपर्यंत सदर बसेस बेस्टच्या सेवेत असणार आहेत. 


कर्मचाऱ्यांचा मेळावा 


संघर्ष कामगार कर्मचारी युनियन या संघटनेच्यावतीने उद्या, शनिवारी बेस्टच्या संपात असलेल्या कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सीएसटीजवळील मुंबई मराठी पत्रकार संघाजवळील 'सिटू' कार्यालयाजवळ मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे सचिव जगनारायण कहार यांनी दिली.


संपामुळे 'या' आगारांवर परिणाम


कामबंद आंदोलनामुळे बॅकबे, कुलाबा, मुंबई सेंट्रल, वरळी, प्रतिक्षा नगर, आणिक, धारावी, काळाकिल्ला, देवनार, शिवाजी नगर, घाटकोपर, मुलुंड, मजास, सांताक्रूझ, ओशिवरा, मालवणी, गोराई आणि मागाठणे या आगारांच्या बस गाड्या प्रवर्तनावर फरक पडला.


बेस्टमध्ये कंत्राटी बसेसचा समावेश का?


बेस्ट प्रशासन आर्थिक अडचणीत सापडलं आहे. खर्च कमी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने आपल्या ताफ्यात कंत्राटी पद्धतीने बस ताफ्यात घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी निविदा काढण्यात आल्या. बस आणि चालक यांची नियुक्ती कंत्राटदाराकडून करण्यात येते. तर, निविदेत निश्चित केलेली रक्कम कंत्राटदाराला बेस्टला द्यावी लागते. यामुळे नवीन बस खरेदी आणि नवीन चालकांची नियुक्ती बेस्टला करावी लागत नाही. त्याच्या परिणामी बेस्टची काही प्रमाणात बचत झाली. कंत्राटदाराकडून बेस्टच्या मिनी एसी बस, एसी बस, इलेक्ट्रीक बस चालवण्यात येते. मुंबईत विविध आगारात वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून सेवा पुरवण्यात येते.