मुंबई : अजित पवारांच्या विमान अपघाताची बातमी ताजी असतानाच आता मुंबई विमानतळावर एक मोठा अनर्थ टळला. मुंबई विमानतळावरील (Mumbai Airport) टॅक्सीवेवर एअर इंडिया (Air India) आणि इंडिगो (IndiGo) यांच्या विमानांचे पंखे एकमेकांना घासले (Wingtip Contact). एअर इंडियाच्या टेक-ऑफपूर्वी आणि इंडिगो विमानाच्या लँडिंगनंतर टॅक्सींगदरम्यान दोन्ही विमानांच्या पंख्यांचा परस्पर संपर्क झाला. सुदैवाने या घटनेत सर्व प्रवासी सुरक्षित असून, दोन्ही विमान कंपन्यांनी अधिकृत निवेदन जारी केले आहे.

एअर इंडियाचे AI2732 हे उड्डाण 3 फेब्रुवारी रोजी मुंबईहून कोईंबतूरकडे (Mumbai to Coimbatore Flight) जाणार होते. टेक-ऑफपूर्वी हे विमान टॅक्सीवेवर थांबले असताना त्याचवेळी लँड झालेले इंडिगो विमान (IndiGo flight 6E 791)  टॅक्सिंगसाठी त्या ठिकाणी येत होते. यावेळी इंडिगो विमानाच्या पंख्याची आणि एयर इंडिया विमानाच्या पंख्याची एकमेकांना धडक बसली. 

सर्व प्रवाशांना सुरक्षित उतरवले

या धडकेत एअर इंडियाच्या विमानाच्या पंख्याचे म्हणजे विंगटिपचे नुकसान झाले. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित विमान पुढील तांत्रिक तपासणीसाठी ग्राउंड करण्यात आले. त्यातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आले असून, त्यांना गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचं कंपनीने स्पष्ट केलं.

इंडिगोचे विमान हे हैदराबादहून मुंबईला (Hyderabad to Mumbai Flight) पोहोचले. लँडिंग झाल्यानंतर टॅक्सिंग दरम्यान ही घटना घडल्याचं इंडिगो कंपनीने स्पष्ट केलं. विमानाचे टॅक्सिंग केल्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आले. संबंधित विमानाची देखभाल तपासणी केल्याची माहिती इंडिगोने दिली. 

Air India IndiGo Wingtip Collision : घटनेनंतरची दोन्ही विमानांची तपासणी

दोन्ही कंपन्यांनी या घटनेची माहिती तत्काळ संबंधित नियामक प्राधिकरणांना (Aviation Regulator) दिली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून दोन्ही विमानांची सखोल तांत्रिक तपासणी केली जात आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य (Passenger Safety Priority)

एअर इंडिया आणि इंडिगो या दोन्ही कंपन्यांनी प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केलं. या घटनेमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअर इंडिया आणि इंडिगो विमान कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे.

या घटनेमुळे विमानतळावरील टॅक्सिंग प्रक्रियेबाबत (Aircraft Taxiing Process) पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, चौकशीनंतर नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.