Baramati Accident : बारामती तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. सुपे येथील दोन सख्ख्या भावांचा घरी जाताना अपघात झाला आहे. घर अवघे दोन ते तीन मिनिटांच्या अंतरावर असतानाच समोरुन भरधाव वेगाने आलेल्या ट्रकची त्यांच्या मोटारसायकलला भीषण धडक बसली. या भीषण अपघातात एका भावाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
दरम्यान, ही अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही भाऊ कामानिमित्त मोरगाव येथे गेले होते. काम आटोपून ते मोटारसायकलवरून सुपे येथील आपल्या घरी परतत असताना चौफुला बाजूकडून आलेल्या ट्रकखाली त्यांची मोटारसायकल शिरली आणि भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका भावाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या भावावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर कलानगर जंक्शन जवळ मोठा अपघात
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर कलानगर जंक्शन जवळ मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. भारधाव वेगाने जात असलेल्या कारने 2 बाईकला जोरदार धडक दिल्यामुळं दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. अंधेरीकडून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्गावर कलानगर उड्डाण पुलावर हा अपघात झाला आहे. या अपघातामुळं बांद्रा कलानगर परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
जखमींना जवळच्या रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे तर कारला बाजूला काढून वाहतूक सुरळीत सुरू करण्याच्या प्रयत्न सुरु आहेत. अपघात कशामुळे झाला या संदर्भात खेरवाडी पोलिसांकडून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.