मुंबई : उंचच उंच इमारतींचे मनोरे असलेलं मुंबई (Mumbai) शहर गावकडच्यांना मायानगरी वाटतं. मुंबईच्या इमारतींकडे पाहून किती हे मोठं, किती हे उंच असं म्हणत आपल्या भुवया उंचावतात. मात्र, या उंच इमारती अनेकदा धोक्याची घंटा ठरतात. कधी उंच इमारतीवरुन अपघात होतात, तर कधी आगीच्या घटनांनी अग्निशमन दलाची मोठी धावाधाव होते. मात्र, निर्माणधीन इमारतीच्या (Building) कामामुळे एका 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईतील जोगेश्वरी परिसरात घडली. जोगेश्वरी पूर्वेला बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंगमधून सिमेंट वीट खाली पडून 22 वर्षीय तरुणीचा जागीच (Accident) मृत्यू झाला आहे.
जोगेश्वरी पूर्वेत मजासवाडी परिसरात आज सकाळी 9:30 च्या सुमारास कामासाठी जात असलेल्या 22 वर्षीय तरुणीच्या डोक्यावर उंच इमारतीवरुन सिमेंट ब्लॉक पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर, स्थानिकांनी धावाधाव करत महिलेला रिक्षातून रुग्णालयात नेले, मात्र उंचीवरुन वीट पडल्याने मोठा रक्तश्राव झाल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. येथील इमारतीचा बांधकाम सुरू होता, याच बांधकाम इमारतीमधून पांढऱ्या रंगाचा सिमेंट ब्लॉक पडून 22 वर्षीय संस्कृतीचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतच मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचे शवविच्छेदन करण्यासाठी पार्थिव रुग्णालयात पाठवले आहे. दरम्यान, घटना कशामुळे घडली, यामध्ये चूक कोणाची आहे, या संदर्भात मेघवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
मुलीच्या वडिलांची पोलिसांत फिर्याद (Father complaint about doughter death)
मृत मुलीचे वडिल अनिल उमेश अमिन (वय ५६ वर्षे) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मी जोगेश्वरी पूर्व येथे पत्नी सुप्रिया, आई पदमावती, मुलगी संस्कृती, (वय २२ वर्षे), आणि भाची नामे निशीता बेमेरा असे राहतो. माझा केटरिंगचा व्यवसाय असून माझी मुलगी संस्कृती हिने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केलेला असून सध्या गेल्या 4-5 दिवसांपासून RBL बँक, गोरेगाव (प.) मुंबई या ठिकाणी कामास जाते. तिची कामावर जाव्याची वेळ सकाळी 9.30 ते 6.20 एवढी आहे. आज 10 ऑक्टोबर रोजी माझी मुलगी संस्कृती नेहमीप्रमाणे सकाळी 9.30 वा. घरातून कामावर जाण्यास निघाली. त्यावेळेस, मी घरी नाश्ता करीत बसलो होतो, त्याचवेळी बाहेरून जोरात ओरडण्याचा आवाज आल्याने मी बाहेर, जाऊन पाहिले असता, बाहेर गर्दी जमल्याचे दिसले. त्यावेळी गर्दीतून मी पुढे जावून पाहिले असता, माझी मुलगी संस्कृती रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली दिसली, मी घाबरलो आणि तिला जवळ जावून पाहिले असता, तिच्या डोक्यावर जोरात मार लागल्याने भरपूर प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचे दिसले. त्यावेळी, मी काय झाले याबाबत विचारणा केली असता, तिच्या डोक्यात उंच निर्माणधी इमारतीवरुन पांढरी सिमेंटची वीट पडल्याचे समजले. त्यानंतर, तिला तात्काळ जवळील रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे.