मुंबई : एमपीएससीच्या आंदोलनाला खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांची फूस असल्याची शंका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. एमपीएस भरती प्रक्रियेबाबत लवकरच शासन स्तरावर उपाययोजना सुरु करु, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलं.

आजच्या आंदोलनात तरुणांसोबतच खाजगी क्लासेसचे लोकही सहभागी होते, असा आरोप करताना मुंबईत झालेल्या एमपीएससीच्या आंदोलनाला खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांची फूस असल्याची संशय फडणवीसांनी व्यक्त केला.

विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून एमपीएससी भरतीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी बेरोजगारांच्या संख्येचा आढावा घेण्यासाठी दर तीन महिन्यांनी सर्व्हे करणार असल्याचं स्पष्ट केलं.
MPSC च्या भोंगळ कारभाराविरोधात मुंबईत विद्यार्थ्यांचा ‘आक्रोश’

स्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रियेविरोधात मुंबईत विद्यार्थ्यांनी ‘आक्रोश मोर्चा’ काढणार आहेत. महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघर्ष समितीच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

राज्यात गेल्या काही वर्षांपासून विविध विभागातील रिक्त पदं भरली गेलेली नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.