Sanjay Raut PC : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन प्रत्येकानं घ्यावं, पण जो व्यक्ती तिथे नतमस्तक होतोय, त्यानं चांगल्या मनानं तिथे जावं, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. दरम्यान, आज शिंदे गट शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांच्या स्मृतिंना अभिवादन करणार आहेत. यावर माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं आहे. तसेच, हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि स्मारकावर या, असं आवाहनही शिंदे गटाला राऊतांनी केलं आहे.


देश हादरवणाऱ्या श्रद्धा हत्याकांडावरही (Shraddha Murder Case) संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. मारेकऱ्यांवर खटले न चालवता, भरचौकात फासावर लटकवा, असं म्हणत संजय राऊतांनी या प्रकरणावर कोणीही राजकारण करु नये, असंही म्हटलं आहे. 


ठाकरे गटाचे (Thackeray) खासदार संजय राऊत म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे या देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मगच स्मारकाला हात जोडायला जा. खंजीर बाजूला ठेवा आणि मग बाळासाहेबांना नमस्कार करायला आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला जा. बाळासाहेब सगळं पाहतायत, काय सुरु आहे आणि काय होणार आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत लोक खंजीर खुपसतायत. त्यांचं कधीच भलं झालेलं नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन प्रत्येकानं घ्यावं, पण जो व्यक्ती तिथे नतमस्तक होतोय, त्यानं चांगल्या मनानं तिथे जावं."


मारेकऱ्यांवर खटले न चालवता, भरचौकात फासावर लटकवा; श्रद्धा हत्याकांडावर संजय राऊतांचा संताप 


श्रद्धा वालकर हत्याकांडावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "आमच्या महाराष्ट्रातील मुलीची ज्याप्रकारे हत्या झाली, हे अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. समाज माध्यमांवरुन ओळखी होतात आणि त्या ओखळींचं रूपांतर भयंकर नात्यात होतं. आणि ज्या पद्धतीनं त्या मुलीचे तुकडे तुकडे करुन मारलंय, त्या मुलीच्या वडिलांची मुलाखत मी आता वाचत होतो की, त्या मुलीच्या वडिलांचा, कुटुंबीयांचा आक्रोश आहे. त्या मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्या धुंदी आणि गुंगीत ही मुलं जगतायत, हे आज पुन्हा एकदा कळलंय. आपला जीव गमावताय. अशा लोकांना जे खूनी आहेत, हत्यारे आहेत. यांच्यावर खटलेही चालवू नयेत. या प्रकरणावर राजकारण कोणी करत असेल तर ते बंद केलं पाहिजे. यांच्यावर खटले न चालवता, हा जो परिस्थितीजन्य पुरावा समोर दिसतोय, त्या आधारे त्यांना भर चौकात फासावर लटकवलं पाहिजे."


"आपल्या मुलींनीही सावधपणे जगण्यास शिकलं पाहिजे. अशाप्रकारे फसवून जे काही केलं जातंय ही विकृती आहे. पण विकृतीपेक्षाही पुढचं पाऊल आहे. जे रोज खुलासे होतायत, ती थरारक आहे. आम्ही आमच्या मुलींकडे पाहतो की, आम्ही कोणत्या समाजात जगतो आणि वावरतो. यावर कोणी कोणत्याही प्रकारचं राजकारण करत असेल, तर तेसुद्धा समाजाचे शत्रू आहेत, असं मी मानतो." , असंही ते म्हणाले.