ठाणे : मीरा रोड भागातील 7 बोगस कॉल सेंटरवर रात्री पोलिसांनी मोठी कारवाई केली. रॉयल कॉलेज शेजारील डेल्टा बिल्डिंगमधून तब्बल 700 हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या 200 पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केली.
देशातील सर्वात मोठी कारवाई!
या कॉल सेंटरद्वारे परदेशातील लोकांना फोन करुन टॅक्स रिव्हिजनच्या नावाने गंडवलं जात असल्याचा आरोप आहे. पॉलिसीच्या नावाने लोकांच्या अकाऊंटची गोपनीय माहिती गोळा करुन त्यातून रक्कम पळवण्याचं काम या कॉल सेंटर्समधून चालत होते. याच आरोपाखाली मीरा रोडच्या एकूण तीन कॉल सेंटर्सवर ठाणे पोलिसांनी कारवाई केली. देशात कॉल सेंटरवर पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याचं सांगितलं जातं आहे.
या बोगस कॉल सेंटरमध्ये नेमकं काय काम करायचे?
मीरा रोडमधील डेल्टा टॉवरच्या सातव्या मजल्यावर वेगवेगळ्या लोकांकडून 7 कॉल सेंटर चालवले जात होते. कॉल सेंटरमधील कर्मचारी लोकांना फोन करुन इन्श्योरन्स पॉलिसी विक्री, सरेंडर करुन रक्कम परत देण्याचं आमिष दाखवत पैसे गोळा करत असत किंवा बँक अकाऊंटची माहिती मिळवून पैसे लंपास करत असत. लोकांच्या अकाऊंटवरुन ऑनलाईन शॉपिंगही केल्याची माहिती समोर आली आहे. अनेक कॉल सेंटरवरुन इन्कम टॅक्स गोळा करण्याची धमकी देऊन पैशांची वसुलीही केली जायची.
आंतरराष्ट्रीय रॅकेट?
ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा तपास सुरु केली आहे. यात इंटरनॅशनल रॅकेट असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र,अद्याप काहीही निश्चित असं समजू शकलेलं नाही. मात्र, पोलिसांकजून सर्व शंका तपासून पाहिल्या जाणार असून, या प्रकरणाचा तपास वेगाने केला जाणार असल्याची माहिती मिळते आहे.