Monsoon Rain Updates: एरवी कायम 7 ते 8 जूनपर्यंत मुंबईत येणारा मान्सूनचा पाऊस यंदा 15 तारीख उलटून गेली तरी मुंबईत दाखल झालेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यासोबतच पाणी कपातीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मान्सून तळकोकण आणि रत्नागिरीत (Ratnagiri) काही दिवसांपूर्वीच दाखल झाला होता. त्यानंतर तो मुंबईत(Mumbai) येईल, असे वाटत असतानाच मान्सूनच्या (Monsoon) वाटचालीला अचानक ब्रेक लागला आहे. मान्सून आता 20 जूननंतर पुढे सरकेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. 18 ते 20 जूनदरम्यान दक्षिण किनारपट्टीवरुन मान्सून पुन्हा जोर धरेल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना पावसासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. पाऊस नसल्यामुळे मुंबईच्या वातावरणातील प्रचंड उकाडा अजूनही कायम आहे. (Maharashtra Weather Updates)

Continues below advertisement

मुंबईमध्ये सोमवारी सांताक्रूझ येथे 35.2  तर कुलाबा येथे 35 अंश सेल्सिअस कमाल तामपान नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे 3.1 आणि 3.5 अंशांनी अधिक होते. किमान तापमान 30 अंशांहून खाली उतरले असले तरी किमान तापमानानेही अजून फारसा दिलासा दिलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना अजूनही उकाडयाचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच हवेतील आर्द्रताही 60 ते 70 टक्क्यांदरम्यान असल्याने उकाड्यापासून मुंबईमध्ये दिलासा मिळण्याची अजिबातच संधी नव्हती. मुंबईमध्ये मंगळवारीही हेच वातावरण कायम राहील, अशी शक्यता आहे.

Mumbai Water Cut: मुंबईवर पाणीटंचाईचं सावट? धरणसाठा घटला; 20 टक्के पाणी कपातीचा प्रस्ताव चर्चेत 

Continues below advertisement

मुंबईत पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने आणि धरणांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने आता आगामी काळात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठ्यावर प्रशासनाची नजर असून, सध्याची परिस्थिती अशीच कायम राहिल्यास पाणी कपातीचा निर्णय आणखी कठोर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या मुंबईत 10 टक्के पाणी कपात लागू आहे. मात्र पाऊस लांबल्यास पुढील आठवड्यापासून ही कपात 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. याबाबत अधिकाऱ्यांमध्ये मतमतांतरे असून, पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांची पाण्याची गरज भागवण्यासाठी धरणांमधील उपलब्ध साठा महत्त्वाचा असतो. मात्र पावसाने आणखी विलंब केला तर पाणी व्यवस्थापनासाठी प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागू शकतात. त्यामुळे आता मुंबईकरांच्या नजरा मान्सूनच्या आगमनाकडे लागल्या आहेत.

आणखी वाचा

सॅटेलाईट इमेजमधून देशातील मोसमी ढग अक्षरशः गायब! महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा, पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज