मनसे कार्यकर्त्यांची पुन्हा दादागिरी, राज ठाकरेंविरोधात पोस्ट करणाऱ्याला मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 05 May 2019 11:01 AM (IST)
'टीका करावी, आम्ही ती सहनही करु, पण जर कोणी खालच्या पातळीवर टीका करत असेल, तर त्याला असाच धडा शिकवला जाईल' असा इशारा मनसेचे गटनेते संदीप देशपांडेंनी दिला.
मुंबई : मनसे कार्यकर्त्यांच्या दादागिरीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध व्हॉट्सअॅपवर पोस्ट करणाऱ्या तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात अंबरनाथ मध्ये राहणाऱ्या संदीप तिवारी या तरुणाने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या कार्यालयात आणून संदीप तिवारीला उठाबश्या काढायला लावल्या. अंबरनाथच्या पूर्वेकडील धारा रेसिडेन्सी संकुलात हा प्रकार घडला. VIDEO | राज ठाकरेंविरोधात व्हॉट्सअॅपवर कमेंट करणाऱ्याला मारहाण | अंबरनाथ | एबीपी माझा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या घटनेचं समर्थन केलं आहे. 'टीका करावी, आम्ही ती सहनही करु, टीका करणे हा लोकशाहीचा हक्क आहे, पण जर कोणी अशाप्रकारे खालच्या पातळीवर टीका करत असेल, तर त्याला असाच धडा शिकवला जाईल' असा इशारा देशपांडेंनी दिला. राज ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना मनसे कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या मारहाणीचा प्रकार नवीन नाही. राज ठाकरेंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका तरुणाला चपलेने चोप दिला होता, तर पुणे, औरंगाबादेतही एकावर शाईफेक करुन मारहाण करण्यात आली होती.