मुंबई : मतदार याद्यांमध्ये असलेला घोळ सोडवण्याच्या आधीच निवडणूक जाहीर झाली आहे, पण आता ज्या ठिकाणी बोगस मतदार आढळेल त्याला मात्र आम्ही मनसे स्टाईलने दणका देऊ असा सज्जड दम मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिला. मुंबईसह नवी मुंबई, ठाण्यामध्ये अनेक बोगस मतदार असल्याचा आरोप करत मनसेने निवडणूक आयोगाला पुरावेही दिले होते. त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने संदीप देशपांडे यांनी बोगस मतदारांना इशारा दिला.
मुंबईसह राज्यातील 29 महाालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम (Municipal Corporations Election Schedule) जाहीर झाला आहे. 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर संदीप देशपांडे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
MNS On Bogus Voter : बोगस मतदारांना इशारा
संदीप देशपांडे म्हणाले की, "साडे तीन वर्षे झाली, गंगेत घोडं न्हालं. आज निवडणुका, उद्या निवडणुका, चार महिने पुढे असं सुरू असताना आज निवडणुका जाहीर झाल्या ही आनंदाची बाब आहे. पण मतदार यादीत जो घोळ होत तो सोडवण्याच्या आधी तशाच पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. एक निश्चित सांगतो, जिथे आम्हाला बोगस मतदार आढळला, तिथे आम्ही त्याला काय ट्रीटमेंट द्यायची हे राज साहेबांनी सांगितलं आहे."
मुंबईचा महापौर हा मराठीच असेल अशी भूमिका घेऊन मराठी माणूस निवडणुकीत उतरेल असा विश्वास संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला.
Bogus Voter List : मतदारयाद्यांमध्ये दोष, मनसेचा आरोप
राज्य निवडणूक आयोगाने ज्या मतदार याद्या जाहीर केल्या आहेत त्यामध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने केला होता. त्या संबंधी ठिकठिकाणी मनसेने बोगस मतदारही शोधले होते आणि त्याचे पुरावे निवडणूक आयोगाला दिले होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीही या संदर्भात राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेत त्यावर चर्चा केली होती. असं असलं तरी आता त्यावर काही कारवाई केली गेली नसल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे.
राज्यातील 29 महापालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत. या महापालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आली असल्याने त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाहीत असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
Municipal Corporations Election Schedule : महापालिकेच्या निवडणुकीच्या तारखा
- नामनिर्देशन पत्र स्वीकारणे - 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
- अर्जाची छाननी - 31 डिसेंबर
- उमेदवारी माघारीची मुदत - 2 जानेवारी
- चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी - 3 जानेवारी
- मतदान - 15 जानेवारी
- निकाल - 16 जानेवारी
ही बातमी वाचा: