MNS Mira Bhayandar Morcha: मिरा-भाईंदरमध्ये आज (मंगळवारी, ता-8) महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आज सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेलपासून (Balaji Hotel) या मोर्चाला सुरुवात होणार होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी मनसेच्या अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. अनेक कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यानंतर मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे यांनी आम्ही मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे म्हटले होते. या ठिकाणी ठाकरे गट आणि मनसे यांच्या आंदोलनासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना आणि मराठी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पोशाख घालून घोड्यावरती बसून एक चिमुकला या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे. 

त्याचबरोबर त्याच्यासोबत माध्यमांनी संवाद साधला त्यावेळी तो म्हणाला, महाराष्ट्राक राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे. महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही त्यामुळं हा मोर्चा सुरू आहे. ओंकार भारत करचे (वय वर्षे 11) असं या चिमुकल्याचं नाव आहे. या आंदोलनामध्ये तो घोड्यावरती बसून सहभागी झाला होता. या ठिकाणी पोलिसांनी आंदोलकाना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली, त्यावेळी त्या लहान मुलाला घोड्यासह पोलिसांनी बाजूला नेलं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला असून महत्त्वाचे चौक, रेल्वे स्थानकं आणि जंक्शनच्या परिसरात बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

 रात्रीच्या अंधारात मनसे कार्यकर्त्यांची धरपकड

पोलिसांनी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर कालपासूनच प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली होती. मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर काहींना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. काल रात्रभर पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांची धरपकड सुरु होती. त्यामुळे मनसेचा आजचा मोर्चा निघणार की नाही, याबाबत अद्याप संभ्रम आहे.

मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाही? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मिरा भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वी काढलेल्या अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी कशी दिली, असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. मी पोलिसांना विचारलं त्याच्यावर सीपींनी मला सांगितलं की, जो रूट दिला त्या रूटवर जुना मोर्चा निघाला त्यांनी कुठल्याही रुटचा आग्रह केला नव्हता. मनसेने स्पेसिफिक अशा रुटचा आग्रह केला. जिथे मोर्चा काढणं कठीण आहे, असा रुट मागण्यात आला. काल रात्री मग त्यांनी अशी मागणी केली की आम्हाला सभा घ्यायची आहे, त्याची परवानगी त्यांना दिली होती, असे फडणवीसांनी सांगितले.

तुम्ही सभा घ्या पण त्यांना स्पेसिफिक अशा ठिकाणीच तो मोर्चा न्यायचा होता की ज्यातनं काही अडचणी निर्माण झाल्या असत्या आणि कायदा सुव्यवस्थेचा विषय निर्माण झाला असता. आता इतके वर्षे आपण सगळेच मोर्चे काढतोय. मोर्चे काढत असताना आपण पोलिसांची चर्चा करून रूट ठरवत असतो. आता ज्यावेळेस 5 तारखेचा मोर्चा या दोन संघटनांनी काढायचा ठरवला होता तर मुंबईत त्यांच्याशी चर्चा होऊन रुट ठरला होता.  मोर्चा काढायला कोणालाही ना नाहीये, पण एखाद्या मोर्चाने जर कायदा सुव्यवस्थेत काही गडबड होणार असेल किंवा अशा मार्गाने तो जाणार असेल की ज्याच्यावर कठीण आहे, पोलिसांना कायदा सुव्यवस्था ठेवणे कठीण आहे किंवा ट्रॅफिक कंट्रोल करणं कठीण आहे. आता तो रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर रेल्वे स्टेशनवर आपल्याला माहिती मीरा-भाईंदरचा रेल्वे स्टेशनची काय परिस्थिती असते. त्यामुळे पोलिसांनी सातत्याने त्यांना विनंती केली की तुम्ही हा रोड बदला. पण ते मोर्चाचा रोड बदलायला तयार नव्हते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.