मुंबई : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर देखील जबर मार लागला आहे. तर कल्पिता पिंगळे यांच्या अंगरक्षकाचंही एक बोट कापलं आहे. हा भ्याड हल्ला एका अनधिकृत फेरीवाल्याने केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. महिला अधिकाऱ्यावर हल्ला करणारा आरोपी पोलिसांकडून जेव्हा सुटेल तेव्हा आमच्याकडून मार खाईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. अशा प्रकारे अधिकाऱ्यावर हल्ला करण्याची हिंमत कशी होते, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 


ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा जीवघेणा हल्ला; दोन बोटे तुटली


ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे या सोमवारी (30 ऑगस्ट) संध्याकाळी माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या, त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.  काल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर कडक कारवाई करण्याचे दिले असल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. 


Raj Thackeray : 'लॉकडाऊन आवडे सरकारला... सर्व गोष्टी सुरु, मग सणांवरच का येता?' राज ठाकरेंचा सरकारला सवाल 


काय आहे प्रकरण
ठाण्यातील कासारवडवली नाका याठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी उच्छाद मांडलाय. ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे या आज संध्याकाळी माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या असताना तिथे आलेल्या अमर्जीत यादव या फेरीवल्याने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची 2 बोटे आणि त्यांच्या अंगरक्षकाचे 1 बोट तुटले. त्यानंतर त्यांना तातडीने वेदांत रुग्णालयात आणि त्यानंतर ज्युपिटर रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 


या फेरीवाल्याने त्यांच्या डोक्यावर चाकुने मारायचा प्रयत्न केला, त्याच वेळी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवल्याने त्यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली आणि तुटून खाली पडली. हल्ला झाल्याचे समजताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी या माथेफिरू फेरीवाल्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने स्वतःच्या गळ्यावर चाकू ठेवून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. हे थरारनाट्य भर रस्त्यात काही वेळ सुरू होते. मात्र त्यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने यादव याला अटक केली.