मुंबई: मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी बोलण्यावरून हुज्जत घालत, मराठीत बोल म्हणणाऱ्यालाच माफी मागायला लावणारा प्रकार समोर आला आहे. मराठीत बोल असे सांगितल्याने परप्रांतीय फळविक्रेत्यांनी विशाल गवळी या तरुणाला कान धरून माफी मागायला लावल्याची घटना आज मुंब्य्रात (Mumbai) घडली आहे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर तुला मराठी बोलावं लागेल, असा आग्रह या तरुणाने धरला. पण त्याची शिक्षा म्हणून त्याला चक्क हिंदीतून माफी मागायला भाग पाडलं आणि कान धरायला लावले, ही घटना समोर आल्यानंतर आता मनसेने संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मुंब्रा पोलिसांनी देखील मराठी तरुणाची बाजू न घेता परप्रांतीय फळविक्रेत्यांच्या तक्रारीवरून त्या तरुणावरच अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे, या घटनेनंतर आता मनसेने (MNS Avinash Jadhav) या तरूणाला पाठिंबा देत संताप व्यक्त केला आहे.
ही आत्तापर्यंतची चौथी घटना
या प्रकरणावरती एबीपी माझाशी बोलताना मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले, "गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात किंबहुना ठाणे जिल्ह्यात हा प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहे. ही आत्तापर्यंतची चौथी घटना आहे. आधी कल्याणमध्ये झाली, त्यानंतर ठाण्यात, नालासोपाऱ्यात, आज परत ही घटना घडली आहे. जर एखादा मुलगा मराठीत बोल असं सांगत आहे. म्हणून त्याला जर महाराष्ट्रात माफी मागावी लागत असेल तर हे आमचं दुर्भाग्य आहे. तुम्ही आम्हाला अभिजात भाषेचा दर्जा देऊन काय उपयोग आहे", असा सवाल यावेळी अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे.
अभिजात भाषेच्या दर्जाच्या बरोबर कायदा पण केला पाहिजे
"जर आमच्या महाराष्ट्रात मराठीला जर आदर नसेल तर, अभिजात दर्जा घेऊन काय करायचं. या अभिजात भाषेच्या दर्जाच्या बरोबर कायदा पण केला पाहिजे. महाराष्ट्रात मराठीबाबत तुम्ही चुकीचे वक्तव्य करणार असाल तर, तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. मी आता डीसीपींकडे जाणार आहे. घडलेल्या घटनेमध्ये या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या तरुणाच्या विरोधात घोषणाबाजी केली गेली, इतकी हिंमत त्यांच्यात कुठून येते. एक मुलगा मराठीत बोला असं सांगतो आणि मराठीत बोलायचं नाही म्हणून त्याला धमकी देणे, त्याला माफी मागायला लावणं आणि परत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमक्या देणार असतील, तर अशा मुसलमान मुलांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, याला धमकी देण्याची मारहाण केल्याची दखल घेतली पाहिजे", अशी मागणी यावेळी अविनाश जाधव यांनी केली आहे.
तर त्यांना घरात घुसून मनसे काय आहे...
"आता हा तरुण घाबरला आहे. पण त्याच्यासोबत मनसे खंबीरपणे उभी आहे. कोणाच्यात हिम्मत असेल तर त्याला काही करून दाखवावं, त्याला काही झालं तर त्यांना घरात घुसून महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय आहे, ते दाखवली नाही तर, आम्ही एका बापाची औलाद नाही", असेही पुढे अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
आज मुंब्य्रामध्ये विशाल गवळी हा मराठी तरुण बाजारात फळे विकत घेण्यासाठी एका विक्रेत्याकडे गेला. विशालने मराठीत फळांचा भाव विचारला त्यावर फळविक्रेता शोएब कुरेशी संतापला आणि म्हणाला, मला मराठी येत नाही, तू हिंदीत बोल. विशाल गवळीने महाराष्ट्रात राहून तुला मराठी का येत नाही, असं विचारलं. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्याचे भांडणात रूपांतर होत असतानाच मोठ्या प्रमाणावर जमाव जमला. त्यानंतर त्याला कान पकडत माफी मागायला सांगितली. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
युवकाला पोलिसांच्या ताब्यात दिले
आम्हाला मराठी येत नाही, काय करायचे ते कर असं गर्दीतले लोकं बोलत होते, ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हिंदी येते तर हिंदीत बोल, वाद कशाला करतो असं बोलून मराठी तरुणाला पोलीस स्टेशनला नेण्यात आले. विशाल गवळी असे तरुणाचे नाव असून त्याला आईने फळं आणायला पाठवले होते. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमातून व्हायरल होत असून नेटीझन्स आपल्या कमेंट करत आहेत.
आणखी वाचा - मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी