मुंबई: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी थेट आपल्या प्रभागात जाऊन नागरिकांचे आभार मानावेत आणि जनतेच्या प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा असते. मात्र प्रत्यक्षात याउलट चित्र दिसत असल्याचा आरोप करत मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी सत्ताधारी आणि इतर पक्षांच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी म्हटले आहे की, जनतेने निवडून दिलेले नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी आज त्यांच्या प्रभागात कुठेच दिसत नाहीत. त्याऐवजी हे प्रतिनिधी फाईव्ह स्टार हॉटेल्सच्या बंद दाराआड ‘आनंदाने कैद’ असल्याचा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे. निवडणूक संपताच सत्तेसाठी चाललेली हॉटेल पॉलिटिक्स लोकशाहीची थट्टा असल्याचे सूचित करत त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताकारणावर बोट ठेवले आहे.(Amit Thackeray)
अमित ठाकरेंची सोशल मिडीया पोस्ट
"नगरसेवक ‘बेपत्ता’ आहेत?" "निकाल लागल्यावर खरं तर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते, लोकांच्या समस्या सोडवायला सुरुवात करायला हवी होती. पण दुर्दैवाने, ज्यांना जनतेने निवडून दिलंय, ते आज फाईव्ह स्टार हॉटेलच्या बंद दाराआड ‘आनंदाने’ कैद आहेत."
"याला नक्की कारण काय? स्वतःच्याच सहकाऱ्यांवरचा अविश्वास? स्वार्थी राजकारण? या राजकीय पळवापळवीमुळे ज्या सामान्य नागरिकांनी मतदान केले त्यांचा अपमान नाही का होतं? किती खाली घसरणार आहे महाराष्ट्राचे राजकारण? या सगळ्या नाटकामध्ये ज्या पर्यटकांनी स्वतःचे कष्टाचे पैसे भरून हॉटेल बुकिंग केलं आहे, त्यांनाही सुरक्षेच्या नावाखाली त्रास सहन करावा लागतोय. लोकांच्या हितापेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आता तरी थांबवा! ‘जमल्यास’… ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवलाय तिच्यासाठी काहीतरी करा", असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.
महापालिकेच्या निकालानंतर नेमकं काय घडतंय?
मुंबई महापालिकेच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मोठं पाऊल उचलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित 29 नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे, एकनाथ शिंदेंना मुंबईतले शिवसेनेचे नगरसेवक फुटण्याची भीती वाटतेय का? एकनाथ शिंदेंना नेमका कुणावर भरोसा नाही का? मुंबईत ठाकरेंना महापौर बसवणं शक्य होईल? यासह अनेक प्रश्नांना जन्म घातला होता तो एकनाथ शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्स निर्णयाने.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढलेल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळालं हे खरं. मात्र, यातलं मोठं यश फक्त भाजपलाच मिळालं असून शिंदेंच्या शिवसेनेला केवळ 29 जागा जिंकता आल्या. मात्र, तरीही मुंबईत निवडून आलेल्या शिवसेना नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये हलवण्यात आला. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन होईपर्यंत, शिवसेनेच्या 29 नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांची बेरीज केल्याशिवाय, भाजप प्रणित महायुतीला 114 ची मॅजिक फिगर गाठणं शक्य नाही. महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ठाकरे बंधू शिवसेनेचे नगरसेवक फोडू शकतात, अशी भीती एकनाथ शिंदेंना सतावत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. याच भीतीपोटी एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मुंबईतल्या नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये हलवल्याचं बोललं जातंय.
