मुंबई : 'कमला मिल आगीच्या घटनेदिवशी मला राजकीय नेत्यांकडून दबावाचे फोन आले', असा खळबळजनक आरोप मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी केला आहे. पण त्यांनी कोणाचेही नाव उघड केलं नाही. यामुळे मनसेनं आता आयुक्तांचीच नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी केली आहे.


मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना ही मागणी केली. 'ज्या अर्थी मुंबईच्या नागरिकांनी ज्यांना पारदर्शी कारभारासाठी निवडून दिलं आहे त्यांची जबाबदारी आहे की, लोकांना खरं काय ते कळायला हवं. त्यामुळे आयुक्त जर दबाव आणणाऱ्या नेत्याचं नाव सांगणार नसतील तर त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी.' अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली.

'कमला मिल अग्नीतांडवातील काही आरोपी अद्यापही फरार आहेत. पोलीस त्यांना अजूनही शोधू शकलेले नाहीत. त्यामुळे ज्याप्रमाणे आयुक्तांवर दबाव आणण्यात आला तसाच दबाव पोलिसांवर देखील आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी देखील लक्ष घालण्याची गरज आहे.' असंही देशपांडे यावेळी म्हणाले.

अजॉय मेहतांनी नेमका काय आरोप केला?    

“कमला मिल आगीची घटना ज्या दिवशी घडली, त्या दिवशी मला राजकीय नेत्यांकडून दबावाचे फोन आले. मी नाव उघड करणार नाही. विरोधी पक्षनेते ते नाव सांगू शकतील.” असा अजॉय मेहता यांनी आरोप केला.

तसेच, “माझ्याकडे 17 ते 18 हॉटेल्स आणि बारची यादी आहे, ज्यासाठी माझ्यावर दबाव होता.”, असेही मनपा आयुक्तांनी सांगितले.

रुफटॉप हॉटेल प्रस्ताव रद्द करणार नाही. नियमावलीची कठोर अंमलबजावणी मात्र करणार असल्याची माहितीही अजॉय मेहतांनी दिली.

आयुक्तांनी काँग्रेसकडे अंगुलिनिर्देश केल्याने काँग्रेसने विरोधी भूमिका घेत, आयुक्तांना बोलायचंच असेल तर स्पष्ट बोलावं असं काँग्रेसने म्हटले. काल (शुक्रवार) महापालिका आयुक्तांनी सभागृहात या संदर्भात निवेदन दिलं.

काय आहे प्रकरण?

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

1 Above पबला गुरुवार 29 डिसेंबरच्या मध्यरात्री भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे.

संबंधित बातम्या :

कमला मिल घटनेदिवशी माझ्यावर नेत्यांकडून दबाव : बीएमसी आयुक्त