MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
MNS On Non Maharashtriyan Street Venders : महापालिका जर कारवाई करणार असेल तर सर्वांवर करावी, परप्रांतिय फेरीवांल्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे अशी तक्रार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

मुंबई: बोरीवली-दहिसर परिसरात कारवाई करताना फक्त मराठी व्यापारी, फेरीवाल्यांवरच कारवाई केली जात आहे, इतर परप्रांतिय फेरीवाल्यांना संरक्षण दिलं जात असल्याची तक्रार करत मनसेने मध्य प्रभागातील कार्यालय गाठलं. कारवाई करत असाल तर नियमाप्रमाणे सर्वच फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबई महानगरपालिकेच्या आर/मध्य प्रभागातील सहाय्यक अभियंता कार्यालयात भेट देत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी फक्त मराठी व्यापाऱ्यांवरच कारवाई केली जात असून, परप्रांतिय व्यापाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा गंभीर आरोप मनसेकडून करण्यात आला.
कारवाई करताना भेदभाव नको
या वेळी मनसे नेते कुणाल माईनकर आणि उपविभाग प्रमुख किरण नकाशे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला जाब विचारला. कारवाई करताना दुजाभाव होत असल्याचा आरोप करत, नियम सर्वांसाठी समान असावेत, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
मनसे नेत्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जर अतिक्रमणविरोधी कारवाई करायची असेल, तर ती सर्व फेरीवाल्यांवर समानपणे झाली पाहिजे. फक्त मराठी व्यापाऱ्यांना लक्ष्य करून कारवाई करणे अन्यायकारक आहे.”
मनसेकडून अमराठी फेरीवाल्यांवरही तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. अन्यथा मनसेकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला. या निवेदनानंतर प्रशासनाकडून योग्य ती दखल घेतली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.
ही बातमी वाचा:
























